Municipal Corporation's image tarnished due to allegations of scams; Nine months of hard work | घोटाळ्यांच्या आरोपामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन; नऊ महिन्यांच्या परिश्रमांना गालबोट

घोटाळ्यांच्या आरोपामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन; नऊ महिन्यांच्या परिश्रमांना गालबोट

नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोना चाचणीच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. ९ महिने अथकपणे घेतलेल्या परिश्रमांना गालबोट लागले आहे. चाचणी न केलेल्या जवळपास सहा हजार नावांचा यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. ही तांत्रिक चूक की जाणीवपूर्वक केलेला घोटाळा याविषयी तर्कवितर्क लढविले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त शहर करण्यासाठी २६१ दिवस अथकपणे परिश्रम घेत आहेत. अनेकांनी या कालावधीमध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या कालावधीमध्ये नवीन रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. स्वत:ची आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू केली. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र उभारले. या उपाययोजना सुरू असताना कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवालही निगेटिव्ह दाखविल्याचे समोर आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या टीमने हा प्रकार निदर्शनास आणला असून या प्रकरणाची सखाेल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. कोरोना चाचण्यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी असणारे डॉ. सचिन नेमाणे यांना तत्काळ निलंबित केले आहे. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपआयुक्त योगेश कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नियुक्त केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला त्याच्या संपर्कातील २० ते २५ जणांची नावे सांगणे अपेक्षित असते. संपर्कातील व्यक्तींचीही महानगरपालिकेच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असते. वास्तविक ॲँटिजेन चाचणी करताना तेथील कर्मचाऱ्यांनी चाचणी करणारांना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची नावे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. ही नावे नागरी आरोग्य केंद्रातून विचारणे अपेक्षित असते. चाचणी केंद्रांमध्ये नावे विचारण्यात आली व तीच नावे चाचणी केलेल्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत अशा प्रकारची ६ हजार नावे चाचणी केलेल्या यादीमध्ये घुसविण्यात आल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नावे घुसविण्यात आली असतील तर ती तांत्रिक चूक आहे की मुद्दाम चाचण्यांची संख्या वाढविलेले दाखविले आहे हे तपासण्याची मागणी केली जात आहे.

ॲँटिजेन किटची मागणी
महानगरपालिकेच्या ॲँटिजेन चाचणी केंद्रांकडून काही दिवसांपूर्वी वाढीव किटची मागणी केली जात हाेती. अनेक केंद्रांमध्ये पुरेसे किट नाहीत. यामुळे तत्काळ किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्याने त्याविषयी प्रस्तावही तयार केला होता. परंतु त्याच वेळेला ४० हजार किट शिल्लक असल्याचे समोर आले. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात किट होते? तर किट नसल्याचे का भासविले जात होते? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोंदणीचे केंद्रीकरण का?
सुरुवातीच्या काळात काेरोना चाचणी केंद्रांवरूनच किती चाचण्या झाल्या याविषयी संगणकीय नोंदणी केली जात होती. परंतु अचानक ही पद्धत बंद करून एकाच ठिकाणावरून त्यांची नोंदणी सुरू झाली. डाॅ. सचिन नेमाणे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात अनेक नागरी आरोग्य केंद्रे क्षेत्रांतील नावे वेळेत नोंदली जात नसल्याचे काही डॉक्टर खासगीत बोलू लागले होते.

चौकशी युद्धपातळीवर व्हावी
कोरोना चाचण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी सलग ९ महिने रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. या आरोपामुळे सर्वांचे मनोबल खचण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची युद्धपातळीवर चौकशी व्हावी. जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. ‘तांत्रिक चुका की घोटाळा?’ याविषयी वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Web Title: Municipal Corporation's image tarnished due to allegations of scams; Nine months of hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.