महापालिका सज्ज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी 12 हजार बेड्सचे व्यवस्थापन, आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:24 AM2021-05-13T10:24:27+5:302021-05-13T10:38:58+5:30

तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.

Municipal Corporation ready: Management of 12,000 beds for the third wave of corona, capacity of ICU unit to be increased to 1500 | महापालिका सज्ज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी 12 हजार बेड्सचे व्यवस्थापन, आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविणार

महापालिका सज्ज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी 12 हजार बेड्सचे व्यवस्थापन, आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविणार

Next

नवी मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत जास्तीत जास्त रुग्ण संख्या २५ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या लाटेशी मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरात १२ हजार बेड उपलब्ध केले जाणार आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या ५ हजारपर्यंत व आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.      
      
नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. १४ एप्रिलला सक्रिय रुग्णांची संख्या ११६०५ पर्यंत पोहचली होती. तेव्हापासून सातत्याने रुग्ण संख्या कमी हाेत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लाट आलीच तर पुन्हा आरोग्य यंत्रणा कोलमडू नये यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. 



तिसरी लाट आलीच तर शहरात जास्तीत जास्त रुग्ण संख्या २५ हजार पर्यंत पोहचू शकते. यामधील ५० टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होतील हे गृहीत धरुन १२ हजार बेड्सची तयारी आतापासूनच करण्यासाठी सुरुवात केली आहे. 

दुसऱ्या लाटेत आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची संख्या कमी पडली होती. सद्य:स्थितीमध्ये शहरात ३ हजार ऑक्सिजन बेड आहेत. त्यामध्ये अजून २ हजार बेडची भर टाकून ५ हजार बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. शहरात ४ हजार सर्वसाधारण बेड्स आहेत. त्यामध्ये अजून ४ हजार बेडची वाढ करण्यात येणार आहे.

तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आई-वडिलाना केअर टेकर म्हणून राहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. बेड उपलब्धतेप्रमाणे मनुष्यबळाचेही नियोजन करावे लागणार आहे. यासाठी विद्यमान कर्मचाऱ्यांना विशेषत: नर्सेसना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तीन ऑक्सिजन प्रकल्प उभारणार
महानगरपालिकेने वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मे अखेरपर्यंत तो प्रकल्प सुरू होईल. या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठीची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे.
 

Web Title: Municipal Corporation ready: Management of 12,000 beds for the third wave of corona, capacity of ICU unit to be increased to 1500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.