महापालिकेला महापौर मॅरेथॉनचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:32 IST2018-12-13T00:31:54+5:302018-12-13T00:32:12+5:30
विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

महापालिकेला महापौर मॅरेथॉनचा विसर
नवी मुंबई : विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत महापौर मॅरेथॉन स्पर्धेचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून महापौर मॅरेथॉन स्पर्धा राबविण्यात आली नसल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
२१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापलिकेच्या माध्यमातून शहरात विविध नागरी विकासकामे करताना शहरात खेळाडू घडावेत, यासाठीही प्रयत्न केले जातात. शहरातील खळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापौर चषकच्या माध्यमातून विविध क्र ीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
या स्पर्धांमध्ये शहरातील तसेच शहराबाहेरील स्पर्धकांनाही सामावून घेण्यात येते. विविध स्पर्धा राबविताना २०१६-१७ आणि २०१७-१८ साली महापौर मॅरेथॉन स्पर्धा राबविण्यात आली नाही. स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी खासगी संस्था पुढे न आल्याने तसेच शहरात फूल की हाफ मॅरेथॉन घ्यायची? याचा तिढा प्रशासनाकडून न सुटल्याने मॅरेथॉन स्पर्धा होऊ शकली नाही. यावर्षीही मॅरेथॉन होणार की नाही? याचा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
महापौर चषक स्पर्धेत समाविष्ट असलेल्या सर्वच स्पर्धा घेण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धांच्या तारखाही ठरविण्यात आल्या आहेत. महापौर मॅरेथॉन स्पर्धाही घेण्यात येणार आहेत.
- नितीन काळे, उपायुक्त, क्र ीडा विभाग