पाण्यासाठी मोर्बे धरणाची चाचपणी

By Admin | Updated: April 30, 2016 02:31 IST2016-04-30T02:31:35+5:302016-04-30T02:31:35+5:30

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे.

Morbe Dam Checking Water | पाण्यासाठी मोर्बे धरणाची चाचपणी

पाण्यासाठी मोर्बे धरणाची चाचपणी

प्रशांत शेडगे,

पनवेल-प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. लोकसंख्या, त्यानुसार अभ्यास समितीने वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महापालिकेसाठी प्रतिदिनी सुमारे ६५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्याकरिता बाळगंगा हेटवणे धरणाबरोबरच पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाची चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून माहिती मागविण्यात आल्याचे समजते.
नवीन महापालिकेच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीने मागील काही महिन्यात भौगोलिक स्थिती, कृषिक अकृषिक क्षेत्र,नगरपालिका, ग्रामपंचायतीचा महसूल, भौगोलिक तसेच प्रशासकीय व आवश्यक मनुष्यबळ आदी गोष्टींचा आढावा घेवून अंतिम अहवाल तयार केला आहे. महापालिका झाल्यानंतर नेमके काय बदल होतील, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार आहे याबाबत परिपूर्ण माहितीचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित महापालिकेला भविष्यात भविष्यात नेमके किती पाणी लागेल याबाबतीचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महापालिकेला पाण्याची मोठ्याप्रमाणात गरज लागणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही तहान भागविण्याकरिता कोणते कोणते पर्याय आहेत याचीही चाचपणी करण्यात आलेली आहे. आजच्या घडीला पनवेल नगरपालिका हद्द आणि नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून रहिवाशांना पुरवते. कामोठे वसाहतीला नवी मुंबई महानगरपालिकेकडून तर खारघरला हेटवणे धरणातून पाणी दिले जाते. कित्येक गावे बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर महानगरपालिका झाली तर पाण्याचे नेमके काय नियोजन करावे लागेल याचा अभ्यासही समितीने केला आहे. प्रस्तावित महानगरपालिकेला एमजेपी,एमआयडीसी हेटवणे धरणातून तर पाणी घ्यावे लागणार आहेच, त्याचबरोबर मोठी तहान शमविण्याकरिता बाळगंगा आणि कोंढाणे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावे लागणार आहे. या धरणातून जवळपास ६00 एमएलडी पाणी उपलब्ध होवू शकते, असा समितीचा निष्कर्ष आहे.

Web Title: Morbe Dam Checking Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.