पनवेल/मुंबई : शिवरायांच्या पावन रायगड भूमीत सर्वांत जास्त लेडीज बार कसे उभे राहतात, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर शनिवारी रात्रीच मनसे नेते योगेश चिले यांच्या नेतृत्वात मनसैनिकांकडून कोन येथील नाइट रायडर्स बारमध्ये तोडफोड करण्यात आली. लाठ्या-काठ्यांसह दगडांनी काचा फोडल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात रविवारी १५ ते २० मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेलमधील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत काही अंतरावर असलेला हा लेडीज बार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. १५ ते २० मनसैनिक हाती लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि त्यांनी बारच्या दर्शनी भागातील काचा फोडल्या तसेच नावाची तोडफोड केली. काही मिनिटांतच ते निघून गेले.
सरकार डान्स बारला संरक्षण देणार का?मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले की, डान्स बार फोडला, यात मराठी-अमराठीचा संबंध नाही; तर तो अधिकृत आणि अनधिकृत असा आहे. राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडला, त्याचीच अंमलबजावणी मनसैनिकांनी केली.
जे अनधिकृत बार आहेत, ते सरकारने तोडले पाहिजेत. आम्ही तोडायची काय गरज? सरकार बसून काय करत आहे? आणि आता काय डान्स बारला संरक्षण देणार आहात का?’ असा सवालही त्यांनी केला.
कायदा हातात घेणे चुकीचे : गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, राज्यात अवैध डान्सबार चालू असेल तर खपवून घेणार नाही. मात्र कायदा हातात घेऊन कारवाई करणे हे योग्य नाही. कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई होईल.