पनवेल मधील पळस्पे येथील अडीच वर्षाचा मुलगा पेणधर मधून बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 23:04 IST2018-03-16T23:04:10+5:302018-03-16T23:04:18+5:30
पेणधर गावातून अडीच वर्षाचा मुलगा गुरुवारी (दिनांक१५ मार्च) संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पनवेल मधील पळस्पे येथील अडीच वर्षाचा मुलगा पेणधर मधून बेपत्ता
पनवेल - पेणधर गावातून अडीच वर्षाचा मुलगा गुरुवारी (दिनांक१५ मार्च) संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळ पळस्पे गावातील असणारा साई रविंद्र पाटील हा आई गीता रवींद्र पाटील हिच्या सोबत पेणधर गावातील महेश पाटील या आपल्या मामाच्या घरी विठ्ठल रूक्मणीच्या उत्सवानिमित्त आला होता. तो संध्याकाळी मामाच्या तीन चार वर्षाच्या मुलांसोबत पायरीवर खेळत होता. ही मुलं खेळून घरात आली, परंतु साई घरात आला नसल्याने त्याच्या मामीने आजुबाजुला शोधा शोध करून सुद्धा तो मिळत नसल्याने मामाला फोन करुन कळवले.
मुलगा हरवल्याचे लक्षात आल्यावर घरातील सर्वांनी गावात सर्वत्र शोध घेतला आणि कुठेही सापडत नसल्याने तळोजा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. तळोजा पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला असून जवळपास असणारे सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळण्यात आले आहे. याशिवाय बाजूस असणाऱ्या विहिरीतील गाळ काढून देखील पाहीले. डॉग स्कॉट च्या मदतीने देखिल तपास केला जात आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास ताबडतोब तळोजा पोलिस ठाण्यात ०२२-२७४१२३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.