बाजार समितीचा नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 01:13 IST2021-04-20T01:12:44+5:302021-04-20T01:13:01+5:30
गर्दीचा महापूर : भाजीसह फळ मार्केटमुळे शहरात कोरोनाचा स्फोट : मार्केटमध्ये पहाटे चक्काजाम

बाजार समितीचा नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. अनेक प्रतिष्ठित व्यापारी व कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही मार्केटमधील गर्दी कमी केली जात नाही. दोन्ही मार्केटमध्ये गर्दीचा महापूर येत असून, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व संचारबंदीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. मार्केटमुळे शहरातही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून महानगरपालिका, पोलीस व बाजार समिती प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कडक निर्बंध लादले नाहीत तर नवी मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढत असून, ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. महानगरपालिका व पोलीस प्रशासन शहरातील कोणत्याही दुकानासमोर पाच पेक्षा जास्त ग्राहक दिसले तर त्यांना ५ हजारपासून १५ हजारपर्यंत दंड आकारत आहेत. रोडवरून चालताना एका व्यक्तीनेही मास्क घातला नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे; परंतु बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ६० ते ८० हजारांची गर्दी हाेत आहे. यांमधील जवळपास २५ ते ३० हजारांची गर्दी फक्त भाजीपाला व फळ मार्केटमध्ये होत आहे. सोमवारी फळ मार्केटमध्ये तब्बल ६३६ वाहनांची आवक झाली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्यासाठीही जागा नव्हती. सर्व विंगमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती.
भाजीपाला मार्केटमध्येही सोमवारी ५४१ वाहनांची गर्दी झाली. मार्केटमध्ये चालण्यासाठीही जागा नव्हती. प्रत्येक विंगमध्ये अत्यंत दाटी-वाटीने व्यापर केला जात होता. डी विंगमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर यांपैकी कोणत्याच नियमांचे पालन केले जात नव्हते. मार्केटच्या बाहेर वाहतूक पोलीस चौकी ते माथाडी भवन रोडवरही चक्काजाम झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती.
डी विंगमध्ये अनधिकृत व्यापार
भाजी मार्केटच्या डी विंगमध्ये सर्वाधिक गर्दी होत आहे. त्या ठिकाणी अनधिकृत किरकोळ विक्री केली जात आहे. परवाना नसणारांना पोटभाडेकरू म्हणून व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे येथे प्रचंड गर्दी होत असून, कोरोनाचा फैलाव वाढत आहे.
आवक मर्यादित हवी
बाजार समितीमध्ये गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मार्केटमधील आवक यावर निर्बंध लादणे आवश्यक आहेत. जास्तीत जास्त माल मार्केटमध्ये न आणता थेट ग्राहकांपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. २०० ते ३०० पेक्षा जास्त वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. कोरोनाविषयी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
मनपासह पोलीस आयुक्तांचेही दुर्लक्ष
बाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये पहाटे सहा ते नऊ या वेळेत चक्काजाम होत आहे. दोन मार्केटमध्ये २५ ते ३० हजार नागरिकांचा जमाव व्यापारासाठी एकत्र येत आहे. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शहरात सर्वसामान्य नागरिक व छोट्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देणारे मनपा आयुक्त अभिजीत बांगर व पोलीस आयुक्त बी. के. सिंह बाजार समितीमधील नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत नाहीत. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नियम न पाळणारांचे गाळे सील करण्याची मागणीही होत आहे.