मॉरेशियसच्या व्यक्तीची हत्या प्रकरण; अल्पवयीन मुलींसोबतची 'मस्ती' बेतली जीवावर
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 20, 2024 18:39 IST2024-05-20T18:39:32+5:302024-05-20T18:39:43+5:30
शारिरिक शोषण वाढल्याने फोडलं डोकं.

मॉरेशियसच्या व्यक्तीची हत्या प्रकरण; अल्पवयीन मुलींसोबतची 'मस्ती' बेतली जीवावर
नवी मुंबई : पारसिक हिल परिसरात झालेल्या मॉरिशियस व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका २० वर्षीय मुलासह दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलींनी शाररिक शोषणाला विरोध करत मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून त्यांच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
सीबीडीच्या पारसिक हिल येथील झाडीमध्ये एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अधिक चौकशीत मृत व्यक्तीचे नाव नवीनकुमार साबू (५३) असून तो मूळचा मॉरिशियसचा असून ९ महिन्यांपूर्वी त्याने भारताचे नागरिकत्व मिळवले होते. काही दिवसांपूर्वीच ते शहाबाज गावात रहायला आले होते. त्यापूर्वी उरणमध्ये रहायला होते असेही चौकशीत समोर आले. तर त्यांच्या हत्येप्रकरणी सीबीडी पोलिसांनी तपासावर भर दिला होता. यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सहायक निरीक्षक सुरेश डांबरे यांचे पथक केले होते. त्यांनी काही तासातच हत्येचा उलगडा करून सईद खान (२०) याच्यासह दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले.
सिग्नलवर साहित्य विकणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुली चेंबूर परिसरातल्या राहणाऱ्या असून सईदच्या मैत्रिणी आहेत. साबू व सईद यांची ओळख असल्याने साबू यानेही दोन्ही मुलींसोबत ओळख वाढवली होती. त्यांना पारसिक हिलवर झाडीमध्ये नेवून त्यांच्यासोबत चाळे करत असे. घटनेच्या रात्री मात्र त्याच्याकडून दारूच्या नशेत शोषण वाढल्याने मुलींनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. शिवाय मदतीला सईद खान यालाही बोलवून घेतले होते. त्यानंतर तिघांनी त्याचे दगडाने डोके ठेचून पळ काढला होता.