'कविता डॉट कॉम'च्या संमेलनात महेंद्र कोंडे यांच्या 'बावनकशी'ची बहार

By नारायण जाधव | Published: January 31, 2024 04:23 PM2024-01-31T16:23:25+5:302024-01-31T16:23:33+5:30

कोपरखैरणेतील नाईक महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास रसिकांनी मोठी उपस्थिती लावली

Mahendra Konde's 'Bawankashi' released at 'Kavita dot com' conference | 'कविता डॉट कॉम'च्या संमेलनात महेंद्र कोंडे यांच्या 'बावनकशी'ची बहार

'कविता डॉट कॉम'च्या संमेलनात महेंद्र कोंडे यांच्या 'बावनकशी'ची बहार

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कविता डॉट कॉमच्या ४२ व्या कार्यक्रमात कविमनाचे प्रसिद्ध निवेदक, नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी आपल्या ‘बावनकशी' कवितांच्या बहारदार सादरीकरणाने रंगत भरली. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या सांगतेनिमित्त नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास रसिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्राच्या ग्रामसंस्कृतीमधील प्रबोधनाचे सदिच्छादूत असलेल्या तीन वासुदेवांना पाचारण करून व त्यांतील ज्ञानेश्वर गोंडे यांना अध्यक्षस्थान देऊन हरिनामाची महती सांगणारी गाणी गायला लावून कविता डॉट कॉमचे निर्मिती सूत्रधार प्रा. रवींद्र पाटील यांनी एक वेगळाच पायंडा पाडला; तर महेंद्र कोंडे यांनी आई, मुलगी, घर, समाजमाध्यमे, शेती, ग्रामीण जीवन, पावसाळा अशा विविध विषयांवरील एकाहून एक कविता साभिनय सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या काही कवितांच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणले तर काही कवितांमुळे श्रोतृवृंदातून हास्याच्या लकेरी उडाल्या. कोंडे यांची एक कविता बालकवी प्रसाद माळी याने सुरात गात उपस्थितांची वाहव्वा मिळवली.

अंमळनेर येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलेले नवी मुंबईकर कवी वैभव वऱ्हाडी यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. नारायण लांडगे यांनी रंगतदार सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जितेंद्र लाड तसेच कविता डॉट कॉमच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Web Title: Mahendra Konde's 'Bawankashi' released at 'Kavita dot com' conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.