Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:12 AM2019-10-05T03:12:35+5:302019-10-05T03:13:08+5:30

पनवेलमध्ये शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर भाजपने उरणमध्ये बंडखोरी करून जशास तसे उत्तर दिले आहे. उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला

 Maharashtra Election 2019 : Rebellion in the Shiv sena & BJP In Uran and Panvel | Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार

Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार

googlenewsNext

नवी मुंबई : पनवेलमध्ये शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर भाजपने उरणमध्ये बंडखोरी करून जशास तसे उत्तर दिले आहे. उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला असून, त्या वेळी प्रशांत ठाकूर उपस्थित असल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. बेलापूरमध्येही बंडखोरी झाली असून, ऐरोलीमध्ये मात्र युतीधर्म पाळण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

नवी मुंबईसह पनवेल, उरणमध्ये युतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. पनवेल मतदारसंघामध्येभाजपच्या प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु शिवसेनेचे बबन पाटील यांनीही अर्ज भरला आहे. जागावाटपामध्ये उरण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. तेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी अर्ज भरला आहे; परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. या वेळी पनवेलचे भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. उरणच्या बंडखोरीला ठाकूरांची साथ असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. शिवसेनेने रायगड जिल्ह्यात युतीधर्माचे पालन केले नसल्यामुळे उरणमध्येही बंडखोरी केल्याची प्रतिक्रिया प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. पनवेल व उरणमध्ये शिवसेना व भाजप एकमेकांविरोधात लढणार हे स्पष्ट झाले असून पक्षश्रेष्ठी बंडखोरांना शांत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबईमध्ये चार दिवसांपासून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. बेलापूरमधून शहरप्रमुख विजय माने यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. ऐरोलीमधून गणेश नाईक यांच्या विरोधात उपनेते विजय नाहटा यांना अर्ज भरण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आग्रही होते. गुरुवारी दिवसभर खासदार राजन विचारे व इतर पदाधिकारी नाहटा यांच्या कार्यालयात तळ ठोकून होते; परंतु नाहटा यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणार नसल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी १.३० वाजता शिवसेनेचा बंडखोर उमेदवार अर्ज भरेल अशी चर्चा सुरू होती; परंतु शेवटपर्यंत कोणीही अर्ज भरला नाही. राष्ट्रवादी काँगे्रसनेही शिवसेनेतील नाराजांशी संपर्क साधला होता; परंतु प्रत्यक्षात कोणीही दाद दिली नाही, यामुळे अखेर महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

ऐरोलीतील बंडखोरी टाळण्यात यश
बेलापूरमधून गणेश नाईक यांची उमेदवारी कापल्यानंतर सर्वाधिक आनंद शिवसेना पदाधिकाऱ्यांना झाला होता; परंतु शेवटच्या क्षणी भाजपने त्यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली. यामुळे तेथेही नाईकांची कोंडी करण्याचा निर्णय शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. ऐरोलीतून विजय नाहटा बंडखोर उमदेवार म्हणून उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु नाहटा यांनी पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊन बंडखोरी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील बंडखोरी टळली.

गणेश नाईकांसोबत शिवसेनेचेही पदाधिकारी
ऐरोली मतदारसंघातून भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी शुक्रवारी अर्ज भरला. शिवसेनेना बंडखोरी करणार असल्यामुळे त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी येणार का? याविषयी शंका उपस्थित केली जात होती. त्यांच्यासोबत शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे जिल्हाप्रमुख रामचंद्र घरत, आरपीआयचे सिद्राम आहोळ, भाजपचे अनंत सुतार, दशरथ भगत व इतरही उपस्थित होते.

बेलापूरमधून २२ उमेदवार
बेलापूर मतदारसंघातून २२ जणांनी अर्ज भरले आहेत. मंदा म्हात्रे (भाजप), अशोक अंकुश गावडे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), अजयकुमार उपाध्याय (युवा जनकल्याण पार्टी), हरजीत सिंघ कुमार (इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी), भानुदास सखाराम धोत्रे (राष्ट्रीय राष्ट्रवादी पार्टी), गजानन श्रीकृष्ण काळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), आप्पासाहेब विष्णू क्षीरसागर (रिपब्लिकन बहुजन सेना), सचिन भारत आव्हाड (बहुजन समाज पार्टी), दादाभाऊ सोनावणे (क्रांतिकारी जयहिंद सेना), स्वप्ना गावडे (राष्ट्रवादी काँगे्रस), यांच्यासह संतोष कांबळे, मुकेश ठाकूर, अनिल घोगरे, विजय माने, शांतिकुमार शेट्टी, गौतम गायकवाड, उमा आहुजा, किरण वाघमारे, चंद्रशेखर रानडे, अभय दुबे, भागवत शर्मा यांचा समावेश आहे.

ऐरोलीत १९ उमदेवार रिंगणात
ऐरोली मतदारसंघातून १९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी अर्ज भरला आहे. संदीप नाईक यांनी डमी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे गणेश शिंदे, मनसेचे नीलेश बानखेले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ढोकने, बसपचे राजेश जैसवाल, इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीचे हरजित सिंह कुमार, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या संगीता टाकळकर यांच्यासह अपक्ष म्हणून प्रीती वीग, बापू पोळ, दिगंबर जाधव, दत्तात्रेय सावळे, हेमंत पाटील, विनय दुबे, सागर नाईक यांनी अर्ज भरला आहे.

शिवसेनेने युतीधर्माचे पालन केले नाही - ठाकूर
पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे उमेदवार असताना ते उरणमधील बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. यामुळे उरणमधील बंडखोरीला ठाकूरांची साथ असल्याची चर्चा सुरू होती. या वेळी ठाकूर म्हणाले की, रायगडमध्ये शिवसेनेने युतीधर्माचे पाळला नाही. भाजपविरोधात उमेदवार उभे केले आहेत, यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव महेश बालदी यांनी अर्ज भरला असल्याचे स्पष्ट केले.
 

Web Title:  Maharashtra Election 2019 : Rebellion in the Shiv sena & BJP In Uran and Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.