महामुंबईला लाभणार विकासाचे पंख; नवी मुंबई ते वाढवण बंदरापर्यंत गरुडझेप
By नारायण जाधव | Updated: October 8, 2025 09:17 IST2025-10-08T09:17:00+5:302025-10-08T09:17:21+5:30
नवी मुंबईत कामासाठी, राहण्यासाठी, स्वयंरोजगार उभे करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यादृष्टीने बुलेट ट्रेनपासून ते मेट्रो, जलवाहतूक, महामार्गांसह सागरी पुलांचे विस्तीर्ण जाळे उभे राहत आहे.

महामुंबईला लाभणार विकासाचे पंख; नवी मुंबई ते वाढवण बंदरापर्यंत गरुडझेप
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळामुळे केवळ नवी मुंबईच नव्हे, तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासह मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गालगतच्या प्रदेशासह थेट गुजरात सीमेवर डहाणूच्या वाढवण बंदरापर्यंतचा परिसर गरुडझेप घेणार आहे.
नवी मुंबईत कामासाठी, राहण्यासाठी, स्वयंरोजगार उभे करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यादृष्टीने बुलेट ट्रेनपासून ते मेट्रो, जलवाहतूक, महामार्गांसह सागरी पुलांचे विस्तीर्ण जाळे उभे राहत आहे. यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश म्हणून हा परिसर ओळखला जाईल. आता उरणनजीक दुबई, शांघायच्या धर्तीवर १२४ गावांचा चेहरामाेहरा बदलेल. विमानतळ परिसरातच दिल्लीच्या धर्तीवर एरोसिटीसह एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटीचा सिडको व ‘एमएमआरडीए’चा प्रस्ताव आहे. ‘एमएसआरडीसी’ने द्रुतगती महामार्गालगत अनेक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत.
ठाणे, रायगड जिल्हा येणार विमानतळाच्या कवेत
आंतरराष्टीय विमानतळासह जेएनपीए बंदर, वाढवण बंदर आणि नवी मुंबईतील प्रस्तावित तीन शिपयार्ड, माझगाव डॉकचा न्हावाशेवा येथे विस्तार, विरार-अलिबाग कॉरिडोर, पेणनजीकचे खासगी टाउनशिप, शीळ-महापे-कल्याण रस्त्यासह अंबरनाथ-बदलापूर परिसरातील खासगी टाऊनशिपचा विकास करण्यात येत आहे.
कामाच्या ठिकाणापासूनच राहण्याचे ठिकाणही जवळ हवे, याच उद्देशाने परिसरात मेट्रो मार्ग, भुयारी बोगदे, सागरी मार्ग, बुलेट ट्रेन प्रस्तावित केली आहे.
अटल सेतू पुढे रेवस-करंजा सागरी मार्गे कोकण ग्रीनफिल्ड हायवेला जोडून अलिबाग परिसर आणि पाेयनाड आणि रोहा- श्रीवर्धन-म्हसळ्याचे बल्क ड्रग्प पार्क, दिघीतील इंडस्ट्रियल सिटीला या विमानतळासह कोकण रेल्वे, जेएनपीएला जोडण्यात येणार आहे. डहाणूचे वाढवण बंदर जेएनपीए आणि या विमानतळाला जोडण्यात येत आहे.
पाण्यासाठी धरणांचे नियोजन
सध्याच्या कोंढाणे, बाळगंगा, हेटवणे धरणाची क्षमता वढविण्यासह नव्याने मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पोशीर व शिलार या सुमारे १९ टीएमसी पाणीसाठा करणाऱ्या प्रकल्पासाठी अनुक्रमे ६,३९४ कोटी व ४,८६९ कोटी रुपये अशा ११,२६३ कोटी रुपयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याशिवाय सिडकोने कोढाणे आणि हेटवणे, बाळगंगाचे पाणी विमान परिसर, नैना क्षेत्रात आणण्याचे काम सुरू केले आहे. सूर्या, काळे शाई धरणाचे काम जोमाने सुरू आहे.