बोल बजरंग बली की जय...
By Admin | Updated: September 7, 2015 04:02 IST2015-09-07T04:02:56+5:302015-09-07T04:02:56+5:30
गोविंदा रे गोपाळा...असा जयघोष करीत बालगोपाळांनी दहीहंड्या फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ हजार ५८७ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या

बोल बजरंग बली की जय...
अलिबाग : गोविंदा रे गोपाळा...असा जयघोष करीत बालगोपाळांनी दहीहंड्या फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ हजार ५८७ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. विविध गोविंदा पथकांनी या हंड्या फोडून लोणी आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची चांगलीच लयलूट केली.
शुक्रवारी रात्री १२ वाजल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर अलिबागचे लक्ष्मीनारायण मंदिर, नागाव, चौल, वरसोली, खंडाळे, खारेपाट विभागासह अन्य ठिकाणी दहीहंड्या फोडण्यात आल्या. यानिमित्ताने कृष्ण पुराणाचे वाचनही करण्यात आले. अलिबाग कोळीवाडा येथील नवजागृती मित्रमंडळाने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचा देखावा तयार केला होता. तो पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
रायगड जिल्ह्यात दोन हजार २३३ सार्वजनिक, तर सहा हजार ३५४ दहीहंड्या फोडण्यात आल्या. दहीहंड्या फोडण्यासाठी सकाळपासूनच बालगोपाळांची धूम सुरु होती. विविध गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्ये गल्लीबोळात, चौकात, नाक्यांवर दिसून येत होती. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा... असे गीत गात घराघरांमध्ये पाणी मागितले. या पथकांमध्ये लहान मुलांपासून वरिष्ठांनीही हजेरी लावल्याचे दिसून आले.
रविवार सुट्टी आणि गोपाळकाला असा योग जुळून आल्याने अलिबागला पर्यटकांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी समुद्र किनारी गर्दी केली होती. काहींनी समुद्रस्नानाचाही आनंद लुटला. पर्यटकांमुळे येथे असणारे भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी यांचे स्टॉल फुलून गेले होते. (प्रतिनिधी)
१नेरळ : येथे गेल्या ८५ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची चौथी पिढी सहभागी झाली आहे. कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाला गावातील व परिसरातील बाळगोपाळ, तरु ण मंडळी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
२उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडल्यानंतर गावातील बाळगोपाळ उर्वरित हंड्या फोडतात. राऊत कुटुंबीयांच्या घरातील सुशीला राऊत यांनी त्यांचे सासरे गोपाळ वाळकू राऊत यांनी गणेशोत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. त्या ठिकाणी मूठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर अशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेवून पूजाविधी केला. तेव्हापासून जन्माष्टमीचा उत्सव सुरु झाला आहे.
३आज या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले. जन्माष्टमीच्या दिवशी नदीच्या पात्रात सापडलेल्या कृष्णमूर्तीचा पूजाविधी केला जातो व रात्री १२ वाजता ती मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो. गावातील सर्व मंडळी उत्सवाला हजेरी लावतात.
४या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दाम्पत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दाम्पत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात.