पनवेलमध्ये कमळ सत्तेत

By Admin | Updated: May 27, 2017 02:25 IST2017-05-27T02:25:06+5:302017-05-27T02:25:06+5:30

महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये एकहाती यश मिळवून भाजपाने इतिहास घडविला आहे. बहुमताची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर

Lotus power in Panvel | पनवेलमध्ये कमळ सत्तेत

पनवेलमध्ये कमळ सत्तेत

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये एकहाती यश मिळवून भाजपाने इतिहास घडविला आहे. बहुमताची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतशबाजी करून विजयोत्सव साजरा केला. दुसरीकडे शेकाप आघाडी व शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्टपणे दिसू लागली होती.
महापालिकेवर सत्ता कोणाची, याविषयी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. पहाटेपासून सहाही मतमोजणी केंद्रांबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मतमोजणी सुरू होताच भारतीय जनता पक्षाने आघाडी घेण्यास सुरुवात केली. भाजपाबरोबर शेकाप आघाडीनेही विजयाचे खाते उघडल्याने दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. पक्षाचे झेंडे फडकावून व फटाके वाजवून आनंद साजरा केला जात होता; परंतु पहिल्या एक तासानंतर भाजपाचा आकडा वाढत गेला व शेकाप आघाडीला हक्काच्या प्रभागांमध्येही अपयश येऊ लागले. यामुळे आघाडीचा उत्साह मावळत गेला. शेकापचे हक्काचे उमेदवार, पराभव झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी घरी जाण्यास सुरुवात केली. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. दुपारी २ वाजल्यानंतर भाजपाने बहुमतावर शिक्कामोर्तब केल्याने सर्वच मतमोजणी केंद्रे भाजपामय झाली होती. विजयाचे शिल्पकार माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेऊन जल्लोष केला. परेश ठाकूरही विक्रमी मतांनी विजयी झाल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळविता आले नाही. महाआघाडीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. सर्वाधिक नाचक्की शिवसेनेची झाली. भाजपाने दिलेल्या २० जागा ठुकारावून स्वबळाचा नारा पक्षश्रेष्ठींनी दिला. उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊनही पक्षाला खातेही उघडला न आल्याने शिवसैनिकांनी दुपारी १ नंतरच मतमोजणी केंद्राबाहेरून काढता पाय घेतला.

पनवेल महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता आल्याने, महापौर भाजपाचाच होणार! हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती प्रवर्ग महिला जागेसाठी हे पद राखीव असल्याने भाजपाच्या गोटातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विजयी महिला उमेदवारांना लॉटरी लागली आहे. पनवेल महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार? याचे गणित महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे सोपे झाले होते. मात्र, भाजपाकडून उमेदवार असलेल्या अनुसूचित जातीच्या चार उमेदवार निवडून आल्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. कविता चौतमल, विद्या गायकवाड, संतोषी तुपे, आरती नवघरे या चार उमेदवार विजयी झाल्या आहेत. मात्र, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत राहिलेले किशोर चौतमल यांच्या पत्नी सुशिक्षित असून, डॉ. कविता चौतमल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडेल, अशी शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीही त्यांचेच नाव चर्चेत होते.

विकासाचे रोल मॉडेल घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो. जनतेने आम्हाला कौल दिला आहे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण राबविण्यासाठी आम्ही पनवेलमध्ये प्रयत्न करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पनवेलचा विकास करणार आहोत. पनवेलचा विकास करण्यासाठी शेकापची सत्ता मोडीत काढणे गरजेचे होते, जनतेने ते केले आहे. पनवेल स्मार्ट सिटी करण्यास आमदार प्रशांत ठाकूर नक्कीच प्रयत्न करतील.
- रामशेठ ठाकूर, माजी खासदार

भाजपाने भ्रष्टाचारी, अनैतिक धंदे चालविणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली. ही माहिती आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवूनही मतदारांनी अशा उमेदवारांना निवडून दिले, हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. यासंदर्भात नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत, तसेच कामोठे, खारघरसारख्या शहरात आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असताना, या ठिकाणी शेकापला जनता नाकारू शकत नाही. ईव्हीएम मशिन घोटाळा झाल्याचा आमचा दावा आहे. खारघरमध्ये याकरिता लेखी तक्र ारही दिली असून आम्ही निवडणूक आयोगासह, न्यायालयात यासंदर्भात दाद मागणार आहोत.
- विवेक पाटील, माजी आमदार, शेकाप

विधानसभेच्या तुलनेत या निवडणुक ीत सेनेचे मताधिक्य वाढले आहे. आमचे कार्यकर्ते जनतेचे नगरसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलो ही आमची सुरु वात आहे. पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- आदेश बांदेकर, सचिव, शिवसेना

भाजपाचा विजय हा संशयास्पद आहे. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकांना सामोरे गेलो होतो. ईव्हीएम मशिन घोटाळ्यासंदर्भात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आमचादेखील याबाबत आक्षेप असून, या संदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे.
- आमदार बाळाराम पाटील, शेकाप

Web Title: Lotus power in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.