लॉकडाउनमुळे पनवेलमधील नद्या झाल्या स्वच्छ; जलचर प्राण्यांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:25 IST2020-05-26T01:25:19+5:302020-05-26T01:25:44+5:30
किनारी भागातील पिकांसाठीही पाण्याचा उपयोग

लॉकडाउनमुळे पनवेलमधील नद्या झाल्या स्वच्छ; जलचर प्राण्यांना जीवदान
कळंबोली : गेल्या अनेक दशकांपासून रसायनमिश्रित पाणी, गटाराचे सांडपाणी, मैलायुक्त पाणी, औद्योगिक वसाहतींचे प्रदूषित पाणी त्याचबरोबर शहरातला कचरा, जैविक कचरा अशा अनेक दूषित घटकांना आपल्यात सामावून घेणाऱ्या कासाडी, काळुंदे, गाढी आणि पाताळगंगा नदीचे पात्र लॉकडाउनमुळे स्वच्छ झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र पनवेल परिसरातील चारही नद्या या काळात निर्मळ झाल्या आहेत. नदी पात्राचे एक प्रकारे शुद्धीकरणच झाले आहे. नद्या प्रदूषणमुक्त झाल्याने जलचर प्राण्यांनाही जीवदान मिळाले आहे.
पनवेल तालुक्यातून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा अशा चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया या नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. इतरही जोडनद्या गाढी नदीतूनच तयार झाल्या आहेत. कासाडी नदी औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाली आहे. शिरवलीच्या डोंगरातून उगम पावून तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहत खाडीला मिळते. या नदीकिनारी काही कारखाने आहेत. अनेक कंपन्यांमधून नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे मासे तसेच इतर जलचर प्राणी मृत पावत आहेत. नदीपासून दोन किलोमीटरच्या परिसरात उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काळुंद्रे व गाढी नदीतही कचरा, सांडपाणी, डेब्रिज, प्लास्टिक कचरा सर्रास टाकला जातो. दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते. याशिवाय डोळे चुरचुरणे, डोके दुखणे, दमा, अस्थमा, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांनी अनेक नागरिक त्रस्त होतात. मात्र लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखाने बंद असल्याने प्रदूषण घटले आहे. परिणामी रसायनमिश्रित सांडपाणी, कचरा नदीपात्रात मिसळणे बंद झाले आहे. त्यामुळे या चारही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. नदी पात्रातील काळपटपणा, उग्र वास पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे हे पाणी नदीकिनारी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.
पर्यावरणप्रेमींकडून स्वागत
गाढी तसेच कासाडी नदी वाचवण्याकरिता पर्यावरणपे्रमींकडून परिश्रम केले जातात. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साफसफाई केली जाते. नदी पात्रातील पाणी दूषित होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे नदी पात्रातील पाणी शुद्ध झाले आहे. लॉकडाउननंतरही पाणी स्वच्छ, साफ राहील यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे मत पर्यावरणप्रेमी संतोष चिखलकर यांनी व्यक्त केले आहे.