जंजिरा किल्ल्यामुळे स्थानिकांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 03:07 IST2016-04-25T03:07:53+5:302016-04-25T03:07:53+5:30

मुरुड तालुक्यापासून चार किलोमीटर अंतरावर राजपुरी गावात ऐतिहासिक जंजिरा किल्ला आहे. या किल्ल्यामुळे राजपुरीमधील मुस्लीम व कोळी बांधवांना रोजगार मिळाला आहे.

Locals get employment due to Janjira | जंजिरा किल्ल्यामुळे स्थानिकांना मिळाला रोजगार

जंजिरा किल्ल्यामुळे स्थानिकांना मिळाला रोजगार

संजय करडे,  नांदगाव/मुरुड
मुरुड तालुक्यापासून चार किलोमीटर अंतरावर राजपुरी गावात ऐतिहासिक जंजिरा किल्ला आहे. या किल्ल्यामुळे राजपुरीमधील मुस्लीम व कोळी बांधवांना रोजगार मिळाला आहे. राजपुरी जेट्टी येथून जंजिरा किल्ला येथे जाण्यासाठी शिडाच्या होड्यांतून पर्यटकांची ने - आण केली जाते. दिवाळी सुटी व एप्रिल - मे महिन्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी येथे पहावयास मिळत. सध्या उन्हाळी सुट्या असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून चांगले उत्पन्न मिळत आहे. या सर्व पर्यटकांना शिडाच्या होडीतून नेण्याचे काम येथील मुस्लीम युवक करीत आहेत.
राजपुरी जेट्टीच्या शेजारीच दाट मुस्लीम वस्ती असल्याने या लोकांना आपसुकच शिड्यांच्या होड्याने ने - आण करण्याचे काम मिळाले आहे. तरुण व बुर्जुग लोक या होड्यांमध्ये काम करत आहेत. स्पर्धात्मक युगात सर्वांनाच नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा फटका सुध्दा मुस्लीम युवकांना बसलेला आहे. मात्र या शिडाच्या होड्यांमुळे चांगला रोजगार मिळत असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षाला तीन लाखांपेक्षा जास्त लोक भेटी देत असल्याचे जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेकडून सांगण्यात आले. राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर प्रौढांसाठी २० रुपये तर लहान मुलांसाठी १० रुपये तिकीट दर आकारला जातो. किल्ल्यावर ने -आण करण्यासाठी १३ होड्या असून पर्यटकांना यातून सुरक्षितपणे किल्ल्यावर पोहचवले जाते. प्रत्येक तिकिटामागे एक रुपया लेव्ही कर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिला जातो. या होड्यांवर सुमारे ६० कर्मचारी तैनात असून त्यांना दरमहा ६ हजार पगार दिला जातो. येथील मुस्लीम तरुण गाइडचे काम करुन अधिक अर्थार्जन करतात.
राजपुरी ते जंजिरा किल्ला हे टेंडर रायगड जिल्हा परिषदेमार्फत काढले जाते व या कामाचा ठेका जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी यांना प्राप्त झाला आहे. या जलवाहतुकीमुळे सुमारे ६० मुस्लीम युवकांना रोजगार मिळाल्याने त्यांचा उदरनिर्वाह होण्यास मदत होत आहे.

Web Title: Locals get employment due to Janjira