इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालय उघडण्यात मग्न
By Admin | Updated: March 23, 2017 01:45 IST2017-03-23T01:45:30+5:302017-03-23T01:45:30+5:30
आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सारेच पक्ष आपापली कार्यालये उघडण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण

इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालय उघडण्यात मग्न
मयूर तांबडे /पनवेल
आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सारेच पक्ष आपापली कार्यालये उघडण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षही आता पुढे सरसावले असून, पक्षाची कार्यालये इच्छुकांच्या गर्दीने फुल्ल होत आहेत. आपापल्या प्रभागात नवीन पक्ष कार्यालये उघडण्यात सारेच पक्ष आघाडीवर आहेत. पक्ष कार्यालय कार्यान्वित करण्यासंबंधी अनेकांनी कार्यवाही सुरू केली आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे पक्षांच्या कार्यालयांचे शटर पुढील पाच वर्षांकरिता बंद केली जातात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कायमस्वरूपी कार्यालये उघडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पनवेल महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे २०१७ मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात पक्षाचे स्वतंत्र कार्यालय उघडण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. पनवेलमध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच लगीनघाई सुरू झालेली दिसत आहे, तर काहींनी आपापल्या प्रभागात पक्ष कार्यालये काही महिन्यांपूर्वीच उघडली देखील आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे जर आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर पक्षांतराला देखील अच्छे दिन येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी मिळते व कोण नाराज होतात हे काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे. कार्यालयामार्फतच जनतेचे प्रश्न सोडवले जातात असे राजकारण्यांचे म्हणणे आहे. परंतु निवडणुका जवळ आल्यावरच पक्ष कार्यालये उघडली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे यातील काही कार्यालये केवळ निवडणुकीकरिताच उघडली जाणार आहेत की कायमस्वरूपी असणार आहेत याबाबत अनभिज्ञता आहे.
मतदारांच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी अनेकांनी आपल्या पक्षाची कार्यालये स्थापन केली आहेत. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांच्या याद्या, मतदार याद्यांचे अवलोकन याकरिता या कार्यालयाचा उमेदवारांना उपयोग होणार आहे, तर अनेक ठिकाणची कार्यालये जशी उघडत आहेत तशीच काही दिवसांनी ती बंद होतात. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकीच पक्ष कार्यालये निवडणुकीनंतर उघडी असतात. अनेकदा उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काही दिवसातच कार्यालयाला टाळे ठोकले जाते तर विजयी उमेदवार देखील काहीच दिवसात आपले कार्यालय बंद करतो. त्यामुळे ही पक्ष कार्यालये निवडणुकीनंतर उघडी राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.