नवी मुंबईतील विविध नोडमध्ये ६६९ सौर दिव्यांची झळाळी; रस्ते, गावठाणात पडला प्रकाश
By नारायण जाधव | Updated: June 24, 2024 15:35 IST2024-06-24T15:34:38+5:302024-06-24T15:35:11+5:30
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या स्मार्ट सिटी व्हिलेज अंतर्गत नवी मुंबईतील दिवाळे गावात सर्वप्रथम सोलर स्ट्रीट लाईट अर्थात सौर दिव्यांनी सुरुवात झाली.

नवी मुंबईतील विविध नोडमध्ये ६६९ सौर दिव्यांची झळाळी; रस्ते, गावठाणात पडला प्रकाश
नवी मुंबई - केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ नवी मुंबई शहराने घेतला आहे. शहरातील ठिकठिकाणचे रस्ते, गावठाणांत आता सौर दिव्यांचा प्रकाश पडू लागला आहे. यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी खास पुढाकार घेतला असून, त्यांनी दिलेल्या आमदार निधीतून शहरातील सर्वच नोडमध्ये आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक सौर दिवे बसविण्यात आले आहेत. आतापर्यंत यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करून आणला असून त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
यात शहरातील जुनी गावठाणांसह महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि पायवाटांचा समावेश आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या स्मार्ट सिटी व्हिलेज अंतर्गत नवी मुंबईतील दिवाळे गावात सर्वप्रथम सोलर स्ट्रीट लाईट अर्थात सौर दिव्यांनी सुरुवात झाली. यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्वप्रथम १० कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. नंतर टप्प्याटप्प्याने शहरातील बेलापूर, सीवूड, नेरूळ, सानपाडा, वाशी या सर्व विभागांत ६६९ सौर दिवे आतापर्यंत बसविले असून यावर २५ कोटी खर्च झाल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
याठिकाणी बसविले हायमास्ट
आतापर्यंत शहरातील महत्वाचे चौकांसह बेलापूर विभागात ३४ तसेच नेरूळचे वंडर्स पार्क, ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, आर. आर. पाटील उद्यानासह वाशी विभागात ३४ असे ६८ सौर हायमास्ट बसविले आहेत. आणखी टप्प्याटप्प्याने बसविण्यात येत आहेत. शहराच्या गरजेनुसार सौर दिवे आणि हायमास्टसाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणण्यात येणार असल्याचे म्हात्रे म्हणाल्या.
दुर्गम भागासह गावठाणे, झोपडपट्टींसह बाजारपेठांमध्ये सोलारदिवे बसविल्याने चोरीच्या घटनांना आळा बसला आहे. विशेषत: सोनसाखळी चोरी, महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे कमी झाले असल्याचा दावा मंदाताई म्हात्रे यांनी केला.