फ्लेमिंगोंच्या मृत्यूला प्रकाश प्रदूषण कारणीभूत - मँग्रोव्ह सेल, बीएनएचएसने केली पाहणी

By नारायण जाधव | Published: April 26, 2024 06:06 PM2024-04-26T18:06:16+5:302024-04-26T18:07:20+5:30

फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर मँग्रोव्ह सेल, बीएनएचएस, नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पथकांनी पर्यावरण प्रेमींसोबत शुक्रवारी डीपीएस फ्लेमिंगो तलावाभोवतालच्या परिसराची पाहणी केली.

Light Pollution cause to Kill Flamingos, BNHS Inspects | फ्लेमिंगोंच्या मृत्यूला प्रकाश प्रदूषण कारणीभूत - मँग्रोव्ह सेल, बीएनएचएसने केली पाहणी

फ्लेमिंगोंच्या मृत्यूला प्रकाश प्रदूषण कारणीभूत - मँग्रोव्ह सेल, बीएनएचएसने केली पाहणी

नवी मुंबई :नवी मुंबईतील नेरूळ येथे फ्लेमिंगोंच्या मृत्यूस प्रकाश प्रदूषण हे एक कारण असू शकते, असे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे. याचदरम्यान, ठाण्यातील दवाखान्यात आणखी दोन फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने आठवडाभरात मृत पक्ष्यांची संख्या १० वर गेली आहे. पाच जखमी पक्ष्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर मँग्रोव्ह सेल, बीएनएचएस, नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पथकांनी पर्यावरण प्रेमींसोबत शुक्रवारी डीपीएस फ्लेमिंगो तलावाभोवतालच्या परिसराची पाहणी केली. याबाबत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार आणि सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्ह समूहाच्या रेखा सांखला यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी पथकाने चाेक पॉइंट्स तपासले, जे जड पाण्याचा प्रवाह रोखतात.

बीएनएचएस अर्थात बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी असे प्राथमिक निरीक्षण नोंदविले की, येथील पथदिवे बदलल्यामुळे पक्ष्यांची दिशाभूल होऊन ते रस्त्यावर उतरले असावेत, तसेच पहाटे उडताना पक्ष्यांना अडथळा निर्माण होऊन ते आदळले असावेत.

खरेतर, जेट्टीच्या अवाढव्य साइन बोर्डवर हे पक्षी कोसळू लागले, तेव्हा नॅटकनेक्ट फाउंडेशनने प्रकाश प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यावर सिडकोने हे फलक काढले होते. आता हा साइन बोर्ड अस्तित्वात नसल्याने पक्षी कोसळण्यामागे दुसरे कोणतेही कारण नाही, असे निरीक्षण बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनी नोंदवले. यानंतर त्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना पाम बीचपासून डीएसपी शाळा आणि नंतर जेट्टी रस्त्याजवळील दिवे बदलण्याची सूचना केली.

पथदिवे बदलण्याची सूचना

बल्बवरील सावली ४५ अंशांच्या कोनात असावी, जेणेकरून प्रकाश खालच्या दिशेने वाहतो आणि बाजूकडे नाही, ज्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या दृष्टीवर परिणाम होणार नाही, असे डॉ. खोत म्हणाले.

प्रवेशद्वारांची तपासणी

मँग्रोव्ह सेल-मुंबईचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने सर्व प्रवेशद्वारांची तपासणी केली. खाडे हे त्यांचा अहवाल मँग्रोव्ह सेलचे प्रमुख व्ही. एस. रामाराव यांना सादर करणार आहेत. यावेळी वनशक्तीचे संचालक स्टॅलिन डी यांनी ब्लॉक केलेले चॅनेलही पथकास दाखवले.

सिडकोच्या ठेकेदारांनी केली चूक

मुख्य अडथळ्यांपैकी एक डीपीएस तलावाच्या दक्षिणेकडील टोकाला वापरात नसलेल्या नेरूळ जेटीसाठी रस्ता तयार करताना सिडकोच्या ठेकेदारांनी बेपर्वाईने जलवाहिनी गाडल्याचे उघड झाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन यांनी हा तलाव स्थलांतरित पक्ष्यांसाठी धोकादायक असल्याबद्दल चिंता व्यक्त करून उपाययोजनांची मागणी केली.

Web Title: Light Pollution cause to Kill Flamingos, BNHS Inspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.