खारघरमध्ये दिसला बिबट्या! खारघर हिलवर मुक्त संचार, नागरिक भयभीत
By वैभव गायकर | Updated: January 8, 2025 17:37 IST2025-01-08T17:37:14+5:302025-01-08T17:37:50+5:30
खारघर शहरात विकासकामे पिकवर आहेत. यामुळे उरले सुरलेली वनसंपदा नष्ट होत चालली असल्याने येथील वन्यजीव मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत शिरकाव करीत आहे.

खारघरमध्ये दिसला बिबट्या! खारघर हिलवर मुक्त संचार, नागरिक भयभीत
पनवेल- खारघर शहराला निसर्गाचा वरदान लाभलेला आहे.मागील काही काळापासुन शहरात खाडीकिनारी सोनेरी कोल्हे पाहिले जात असताना मागील दोन दिवसापासून खारघर हिलवर बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे येथील आदिवासी वाडीतील नागरिकांनी पाहिले आहे.वनविभागाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
खारघर शहरात विकासकामे पिकवर आहेत. यामुळे उरले सुरलेली वनसंपदा नष्ट होत चालली असल्याने येथील वन्यजीव मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत शिरकाव करीत आहे. खारघर सेक्टर 16 परिसरातील खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात कोल्हे पाहिले जात असताना खारघर हिलवरील बिबट्याचा वावर वाढल्याने रहिवाशांनी वनविभागाला पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.
खारघर टेकडीवरील फणसवाडी,चाफेवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत.दररोज कामानिमित्त येथील रहिवाशांना खारघर हिलवरून खाली येजा करावी लागते.अशावेळी बिबट्याने हल्ला केल्यास काय होईल ? असा प्रश्न रहिवाशांना सतावू लागला आहे.दि.8 रोजी पहाटे 6 वाजता देखील काही तरुणांना कामावर जाताना बिबट्या दिसून आला.खूप वर्षानंतर प्रथमच बिबट्या कॅमेऱ्यात कैदय झाला आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.यावेळी कर्तव्यावर असलेले कर्मचारी महेश चन्नगिरे यांनी पाहणी केली असताना त्यांना हिलवर या बिबट्यांनी कोणती शिकार केली नसल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटकांच्या सुरक्षेचे काय ?
खारघर हिल हे स्थानिक पातळीवरील फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे.हिलवरून नवी मुंबई शहराचा दिसणारा विहंगम नाजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक खारघर हिकवर येतात.तसेच सकाळी मॉर्निंगऑकसाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्याने हिलवर येणाऱ्या पर्यटकांच्या देखील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वारंवार दिसणारा बिबट्यामुळे खारघर टेकडीवरील आदिवासी बांधव चिंतेत आहेत.वनविभागाने याबाबत तत्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी वनविभागाकडे केली आहे, असे माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी म्हटले आहे.
वन अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
'डोंगरावर बिबट्या असल्याचे ग्रामस्थांकडून समजले. वन विभागाचे कर्मचारी सायंकाळी गस्त घालत आहे.आम्ही याठिकाणी जनजागृती देखील करीत असुन वेळ पडल्यास बिबट्याला अडकविण्यासाठी याठिकाणी पिंजरा लावला जाईल', असे पनवेल वन परिक्षेत्राचे अधिकारी गजानन पानपट्टे यांनी सांगितले.