बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:26 IST2025-08-05T10:26:21+5:302025-08-05T10:26:51+5:30
खटल्याच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी अज्ञाताने थेट न्यायालयातच हा लिंबू-मिरचीचा उतारा केला होता. यानंतर एक न्यायाधीश चार दिवस सुटीवर गेले होते, अशीही चर्चा आहे.

बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
नवी मुंबई : बेलापूर कोर्टात न्यायाधीशांवर दडपण आणण्यासाठी थेट काळ्या जादूचा प्रयोग होऊ लागल्याचे समोर आले आहे. खटल्याच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी अज्ञाताने थेट न्यायालयातच हा लिंबू-मिरचीचा उतारा केला होता. यानंतर एक न्यायाधीश चार दिवस सुटीवर गेले होते, अशीही चर्चा आहे.
नागरिकांमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच एका वकिलाने पैसे दुप्पट करण्यासाठी मांत्रिकाच्या नादाला लागून पूजेचा घाट मांडला होता. शहरात अशी अनेक उदाहरणे असतानाच थेट न्यायालयातदेखील लिंबू-मिरचीचा वापर होऊ लागल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात बेलापूर कोर्टाच्या पाचव्या मजल्यावर अज्ञाताने मंतरलेली लिंबू -मिरची ठेवली होती. न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींसाठी बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी ते ठेवले होते. एक व्यक्तीने त्याचा काढलेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार समोर आला. त्यानंतर हे लिंबू-मिरची हटवली गेली. मात्र, या घटनेनंतर एक न्यायाधीश चार दिवसांच्या सुटीवर गेले होते अशीही न्यायालयात चर्चा आहे.
न्यायालयात सीसीटीव्ही नाही
बेलापूर न्यायालयात यापूर्वी सरकारी वकिलांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच लिंबू-फिरवण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. इमारतीत सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नसल्याने न्यायालयाचीच सुरक्षा उघड्यावर पडल्याची खंत व्यक्त होत आहे. भविष्यात न्यायालयात कोणती गंभीर घटना घडल्यास सीसीटीव्हीअभावी पोलिसांची तपासात दमछाक होऊ शकते.
पोलिसात तक्रार नाही
न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून अशा घटनांबाबत कोणत्याही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. परंतु, आजवर रस्त्यांवर, चौकात चोरी छुपे घडणारे मंत्र तंत्राचे प्रकार चक्क न्यायालयातचदेखील घडू लागल्याने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे घोंगडे न्यायालयात भिजत पडल्याचे दिसून येत आहे.
अज्ञात व्यक्तीने त्याच्या खटल्याच्या निकालासाठी हा लिंबू-मिरचीप्रयोग केल्याची शक्यता आहे. मात्र, बेलापूर न्यायालयात ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी एका न्यायाधीशाच्या खुर्चीखालीच हळदकुंकू टाकले होते. यावरून न्यायालयात खटल्यांचा निकाल पदरात पाडून घेण्यासाठी न्यायाधीशांवर दडपण आणण्याकरिता थेट लिंबू-मिरचीचाच आसरा घेतला जात असल्याची बाब समोर येत आहे.