नवी मुंबईमध्ये जाळ्यात अडकलेल्या लंगूरच्या पिलाला जीवदान
By योगेश पिंगळे | Updated: September 1, 2023 17:26 IST2023-09-01T17:25:52+5:302023-09-01T17:26:09+5:30
सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले.

नवी मुंबईमध्ये जाळ्यात अडकलेल्या लंगूरच्या पिलाला जीवदान
नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ९ येथील घराच्या टेरेसवरून झाडांच्या वेली सोडण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीत लंगूर माकडाच्या पिलाचा पाय अडकल्याने ते अडकून बसले होते. पुनर्वसू फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी या पिलाची सुखरूपरित्या सुटका करून पिलाला जीवदान दिले.
सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले. या माकडाच्या पिलाची पाहणी केली असता घराच्या टेरेसवरून झाडाच्या वेळी सोडण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीत लंगूर जातीच्या माकडाचे पिलू अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे पिलू सुमारे चार तासाहून अधिक काळापासून अडकले होते. दुसऱ्या माकडांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते शक्य झाले नव्हते. या पिलाच्या रक्षणासाठी त्याचे आई वडील बाजूलाच बसले होते. ते कोणालाही पिलाजवळ येऊ देत न्हवते.
पुनर्वसु टीमने जागेची पाहणी करून पिल्लू १५ फूट उंचीवरवर अडकले असल्यामुळे शिडीवर चढून त्याला काढण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर माकडांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी ऋषी पाटील, अविनाश रोकडे तसेच काही स्थानिक तरुणांनी या माकडांना लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पुनर्वसूच्या सदस्यांनी काही वेळातच पिलाला हातात घेतल्यावर माकडे देखील शांत झाली. प्रसंगावधान राखत पुनर्वसु फाऊंडेशनचे प्रितम, माधव व अनिकेत यांनी त्या माकडाच्या पिल्लाला सुखरूप ताब्यात घेतले. त्याच्या पायात गुंतलेल्या जाळीचा धागा काढण्यात आला. त्यानंतर त्या पिलाची पाहणी करून त्याला कोणतीही इजा तर झाली नाही याची खात्री करून पिलाला त्याच्या आई वडिलांजवळ सुखरूपरित्या सोडण्यात आले. उपस्थित नागरिकांनी पुनर्वसु फाउंडेशनचे आभार मानले.