कॉस व्होटिंगचा फटका आघाडी अन् युतीला
By Admin | Updated: February 25, 2017 03:18 IST2017-02-25T03:18:38+5:302017-02-25T03:18:38+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कर्जत तालुक्यात सावेले जिल्हा परिषद प्रभाग वगळता सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगचा फटका राष्ट्रवादी कॉँग्रेस

कॉस व्होटिंगचा फटका आघाडी अन् युतीला
विजय मांडे, कर्जत
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कर्जत तालुक्यात सावेले जिल्हा परिषद प्रभाग वगळता सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगचा फटका राष्ट्रवादी कॉँग्रेस - शेतकरी कामगार पक्ष - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडी आणि शिवसेना - कॉँग्रेस युतीला बसल्याने जिल्हा परिषदेत आघाडीच्या जागा जास्त आल्या आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले.
राज्यात सत्ताधीश असलेल्या भाजपाला आरपीआयशी युती करून सुध्दा एकही जागा मिळवता आली नाही, उलट त्यांच्या बहुतांश उमेदवारांच्या अनामत रकमा गमवाव्या लागल्या. असे असले तरी त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बसपा, एमएमआय, कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांनी सुध्दा आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु काहींना नोटापेक्षाही कमी मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीचे विशेष म्हणजे कॉँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या कुबड्या घेऊन एक जिल्हा परिषदेची जागा पदरात पाडून घेतली.
गेल्या निवडणुकीत कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा व पंचायत समितीच्या दहा जागा होत्या. या वेळी प्रभाग रचना बदलल्याने जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागा झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शेतकरी कामगार पक्ष आघाडीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सामील झाला. त्यामुळे ही आघाडी अधिक भक्कम झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांनी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु यश आले नाही. अगदी शिवसेने बरोबर जाण्याची तयारी सुद्धा त्यांची होती. त्यांनी शिवसेना- काँगे्रस युती होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही काळ अस्वस्थता होती. अखेर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सकाळीच टोकरे यांनी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले. टोकरे यांनी नेरळच्या सरपंच असलेली आपली भगिनी सुवर्णा नाईक व ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर शिवसेनेतून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून आपल्यावरील बालंट पुसण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर शेलू पंचायत समितीची जागा त्यांनी जिंकून दिली.
कर्जत तालुक्यात बीड बुद्रुक जिल्हा परिषद विभागाची लढत आघाडी व युतीने प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेच्यावतीने उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांचे ज्येष्ठ बंधू आणि विद्यमान उपसभापती मनोहर थोरवे हे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी याच प्रभागातील त्यावेळच्या गौरकामत पंचायत समिती प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी अॅडजेस्टमेंट म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कप -बशी निशाणी घेऊन निवडणूक लढवून जिंकली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष भोईर यांचा अवघ्या अठरा मतांनी पराभव केला होता. या वेळी संतोष भोईर शिवसेनेत गेल्याने थोरवे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती व कामही सुरु केले होते.
आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसने सुधाकर घारे या नवख्या उमेदवाराला निवडणुकीत उतरविले होते. थोरवे आणि भोईर एकत्र झाल्याने ही निवडणूक शिवसेना सहज जिंकेल असे काहींना वाटत होते, परंतु सुधाकर घारे यांनी मनोहर थोरवे यांचा ७१७ मतांनी पराभूत करून शिवसेनेचे गणित बिघडविले. खरे तर संतोष भोईर ज्या उमेदवाराच्या मागे असतात तो जिंकतो असा इतिहास असताना तो इतिहास मागच्या निवडणुकीत त्यांच्या पराभवाने मोडीत निघाला होता.
शेतकरी कामगार पक्षाकडे मागील वेळी जिल्हा परिषदेची एकच जागा होती. या निवडणुकीत आणखी एक जागा निवडून आणून चांगले यश मिळवून दिले. विशेष म्हणजे राजिप माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांना हार माहीत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. ते पाथरज प्रभागातील असताना त्यांनी २००७ मध्ये त्यावेळच्या गौरकामत जिल्हा परिषद प्रभागातून निवडून आले होते तर यावेळी ते उमरोली जिल्हा परिषद प्रभागातून निवडून आले.
शिवसेनेला आपली एक जागा गमवावी लागली. त्यांनी काँग्रेसशी युती करून त्यांना एक जागा जिंकून देऊन काँग्रेसला पुन्हा तालुक्याच्या राजकारणात वाट करून दिली. खरे तर नेरळ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु युतीसाठी त्यांनी आपल्या हक्काच्या जागेवर पाणी सोडले. राष्ट्रवादीने आपल्या दोन जागा राखल्या.