कोळी समाज जाणार दिल्ली दरबारी
By Admin | Updated: May 25, 2017 00:19 IST2017-05-25T00:19:00+5:302017-05-25T00:19:00+5:30
येथील कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी कोळी

कोळी समाज जाणार दिल्ली दरबारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : येथील कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला पुढील आठवड्यात दिल्ली दरबारी येण्यास सांगितले आहे. कोळी समाजाच्या जागेच्या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासनही गीते यांनी दिल्याची माहिती कोळी समाजाचे प्रतिनिधी कुमार भगत, पंकज बना यांनी दिली.
सुमारे १६ एकर जागेवर स्थानिक कोळी समाजाने अतिक्रमण केल्याप्रकरणी कस्टम विभागाने अतिक्रमण तोडण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी सोमवारी पुन्हा केंद्रीय मंत्र्यांशी मोबाइलवर संपर्क साधून प्रश्न सोडविण्याची विनंती केली. शिष्टमंडळ घेऊन दिल्ली दरबारी यावे, तेथे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रश्न मांडतो, असे गीते यांनी सांगितल्याचे कोळी समाजाचे प्रतिनिधी कुमार भगत, पंकज बना यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात आम्हाला केंद्रीय मंत्री गीते यांनी दिल्लीला बोलावले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गीते यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते आम्हाला या प्रश्नी निश्चित मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जागेवरील अतिक्रमण तोडण्याच्या भीतीने कोळी समाज चांगलाच हवालदिल झाला आहे. त्यामुळे ते ज्या कोणाकडून मदत मिळत आहे त्यांच्याकडून ते घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. कोळी समाजाची चौथी पिढी तेथे वास्तव्य करीत आहे. त्याचप्रमाणे आपापले व्यवसायही तेथेच करीत आहेत. कस्टमच्या बडग्याने ते सर्व उद्ध्वस्त होणार असल्याने ते चांगलेच घाबरले आहेत.
दरम्यान, कोळी समाजावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी कोळी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. कोणाचेही उणेदुणे काढण्यापेक्षा त्यांनी संघटितपणे लढा दिल्यास यातून मार्ग निघण्यास मदतच मिळणार आहे.