नवी मुंबई : ऐरोलीतून अपहरण झालेल्या ट्रकचालकाची वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या पुण्यातील घरातून सुटका करण्यात आली. अपहरणाची तक्रार मिळताच रबाळे पोलिसांनी कारचा नंबर मिळवून सीसीटीव्हीच्या आधारे सुटका केली.
शनिवारी रात्री ऐरोली येथे मिक्सर ट्रक आणि कारमध्ये अपघात झाला होता. यावेळी कारमधील दोघांनी ट्रकचालक प्रल्हाद कुमार याला कारमध्ये बळजबरीने बसवून नेले. याप्रकरणी रबाळे पोलिसांत तक्रार करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी रातोरात सीसीटीव्हीच्या आधारे कारचा नंबर मिळवून पुणे गाठले. पूजा खेडकर यांच्या बंगल्यात ही कार आढळली. अपहृत प्रल्हाद कुमार तिथेच आढळून आला.
आईवरही होणार कारवाई
अपघातावेळी व प्रल्हादच्या अपहरणावेळी कारमध्ये कोण होते? याचा उलगडा झालेला नाही. या कारवाईदरम्यान गुन्ह्यातली कार ताब्यात घेताना पूजा खेडकरच्या आईने पोलिसांच्या कामात अडथळा आणला.
यामुळे पूजा खेडकरांच्या आईलाही सह आरोपी केले जाणार असल्याचेही बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.