खारघर-नेरूळ कोस्टल रोडची साडेसाती संपता संपेना!

By नारायण जाधव | Updated: February 25, 2024 18:50 IST2024-02-25T18:49:41+5:302024-02-25T18:50:26+5:30

पर्यावरण नुकसान टाळण्यासाठी तीन पर्यायांचा अभ्यास करा : केंद्राच्या परिवेश समितीची सूचना.

Kharghar Nerul Coastal Road updates | खारघर-नेरूळ कोस्टल रोडची साडेसाती संपता संपेना!

खारघर-नेरूळ कोस्टल रोडची साडेसाती संपता संपेना!

नवी मुंबई : खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या प्रस्तावित कोस्टल रोडमध्ये कमीत कमी खारफुटीच्या नुकसानीसह पर्यावरणीय हानी वाचविण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने सिडकोस तीन पर्यायांचा अभ्यास करून तसा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यात केबल स्टेड ब्रिजसह विद्यमान आराखड्यातील पुलाच्या स्पॅनची लांबी वाढविणे, याचा अभ्यास करून कशामुळे पर्यावरणीय हानी कमी होईल, त्या पर्यायांसह नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सुचविले आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने सिडकोच्या प्रस्तावित सागरी मार्गास मंजुरी देऊन हा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला होता. आता सिडकोस पुन्हा तीन नव्या पर्यायांचा अभ्यास करावा लागणार असल्याने या पुलाची बांधणी काही दिवस लांबणीवर पडणार असून त्याचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. सध्या त्याचा खर्च सिडकोने २०५ कोटी ४० लाख रुपये गृहीत धरला आहे. मात्र, डिझाइन बदलल्यास त्यात आणखी वाढ होणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेस होणार मोठा लाभ
प्रस्तावित रस्ता खारघरच्या सेक्टर १६ येथून सुरू होणार असून तो ९.६ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता सायन-पनवेल महामार्गाला ओलांडून बेलापूर जलवाहतूक जेट्टीलाही जोडण्यात येणार आहे. पुढे तो पाम बीच मार्ग ओलांडून नेरूळ जेट्टीपर्यंत असणार आहे. या मार्गासाठी ३८.४५ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी २.९८ सध्याचा रस्ता अर्थात १०.२१ हेक्टर जागा सिडकोच्या ताब्यात आहे. खारघर येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको बांधत असलेल्या गृहप्रकल्पास या नव्या रस्त्याचा सर्वात जास्त लाभ होणार आहे.

११८२ परिपक्व खारफुटी बाधित
सिडकोने या रस्त्याच्या बांधकामासाठी आदित्य एन्व्हायर्नमेंटल सर्व्हिसेसकडून इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करून तो सीआरझेडला सादर केला आहे. त्यांच्या अहवालानुसार या रस्त्याच्या मार्गात ८.२२ हेक्टर क्षेत्रावरील ११८२ परिपक्व खारफुटीची झाडे बाधित होणार आहेत. त्याबदल्यात त्यांचे सिडको उरण तालुक्यातील न्हावे येथील १२६.८ हेक्टर शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण करणार होती. मात्र, नव्या प्रस्तावात ते आता रोहा तालुक्यातील वणी (गोयंदवाडी) येथे नुकसानभरपाई देणार आहे.

पक्ष्यांच्या ७२ प्रजातींंचा अधिवास
प्रस्तावित कोस्टल राेड ज्या भागातून जात आहे, तो परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या परिसरात पक्ष्यांच्या ७२ प्रजातींचा अधिवास असून त्यापैकी ४८ स्थलांतरित आणि २४ स्थानिक पक्षी आहेत. याशिवाय डीपीएस शाळा, एनआरआय कॉम्पलेक्स आणि टी. एस. चाणक्य परिसरात येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०१८-१९ मध्ये ९६४०० असलेली फ्लेमिंगोंची संख्या २०१९-२० मध्ये १३३००० वर गेली होती, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री संस्थेचे निरीक्षण आहे. त्यामुळे हे पक्षी आणि तेथील पर्यावरणाची विशेष काळजी घेण्याची सूचना सीआरझेड प्राधिकरणाने यापूर्वीच सिडकोस केलेली आहे.

मच्छीमारांचे म्हणणे ऐकून घ्या
कोस्टल रोड ज्या खारघर, बेलापूर, दिवाळे, नेरूळ भागातून जात आहे, त्या परिसरात स्थानिक मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करतात. यामुळे त्यांच्या व्यवसायास अडथळा येणार नाही, याची काळजी घेऊन त्यांचेही म्हणणे ऐकून घ्या, अशाही सूचना सिडकोस केल्या आहेत.

वाहतूककोंड होणार कमी
प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त कनेक्टिव्हिटी मिळून पाम बीच रोडसह सायन-पनवेल महामार्गावरील जड-अवजड वाहनांची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूलाही नव्या रस्त्याचा फायदा होणार आहे.

Web Title: Kharghar Nerul Coastal Road updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.