खारघर कार्पोरेट पार्कची रखडपट्टी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:18 IST2019-07-12T23:18:03+5:302019-07-12T23:18:10+5:30
सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : करार लांबणीवर

खारघर कार्पोरेट पार्कची रखडपट्टी?
नवी मुंबई : मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केसीपी) उभारण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. या पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूरच्या इकॉनिमिक्स डेव्हलपमेंट बोर्ड (ईडीबी) या शासकीय कंपनीची नियुक्ती करण्याचे निश्चित झाले होते; परंतु वर्ष उलटले तरी संबंधित कंपनीबरोबर सामंजस्य करारच झाला नसल्याने खारघर कार्पोरेट पार्कचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात मोठमोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, जेएनपीटी, प्रस्तावित शिवडी सी लिंक, मेट्रो या प्रकल्पांचा समावेश आहे. खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले. या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे एक नवे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या धर्तीवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. खारघर येथील सेंट्रल पार्कच्या बाजूला १२० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आला.
जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण २४ वास्तुविशारदांना भाग घेतला होता. त्यांना विकास आराखड्याच्या संकल्पना सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. स्पर्धात्मक प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या सात कंपन्यांच्या विकास आराखड्यांची सिडकोने निवड केली होती. निवड झालेल्या या सात वास्तुविशारदांना आपले अंतिम आरखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राप्त झालेल्या सातपैकी एका उत्कृष्ट वास्तुविशारद व सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती गठीत केली होती. या समितीने सिंगापूरच्या ईडीबी डिझायनर या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यानंतर लगेच संबंधित कंपनीबरोबर सामंजस्य करार करणे अपेक्षित होते. मात्र, वर्ष उलटले तरी करार न झाल्याने महत्त्वाकांक्षी खारघर पार्कचा आराखडा तयार करण्याचे काम रखडल्याची माहिती सूत्राने दिली. यासंदर्भात सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांच्याशी संपर्क साधला असता करारासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. मात्र, याबाबत नियोजन विभागाकडून सविस्तर माहिती उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले. नियोजन विभागाचे मुख्य नियोजनकार किरण डेंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सिडकोने स्पर्धात्मक प्रक्रियेतून मागविलेल्या प्रस्तावाला सिंगापूर, नेदरलँड, अमेरिका, इंग्लड, फ्रान्समधील वास्तुविशारद कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता, तर नवी दिल्ली, मुंबई व बंगळुरूमधील काही वास्तुविशारदांनी परदेशी कंपन्याबरोबर सामंजस्य करार करून आपले आरखडे सादर केले होते. या स्पर्धात्मक प्रक्रियेत १४ अंतरराष्ट्रीय तर १३ राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी भाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकत या सिंगापूरच्या ईडीबी या शासकीय कंपनीने बाजी मारली; परंतु या कंपनीबरोबरच अद्यापि सामंजस्य करार न झाल्याने खारघर कार्पोरेट पार्क रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केसीपीची वैशिष्ट्य
च्पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट
च्बहुतांशी इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्याची संकल्पना
च्परदेशातील नाइट लाइफच्या धर्तीवर दुकाने व व्यावसायिक गाळ्यांची रचना
च्नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १२.५ किलोमीटरचे अंतर
च्खारघर रेल्वे स्थानकापासून केवळ ५ कि.मी.चे अंतर
च्मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर
च्सायन-पनवेल महामार्गापासून १.५ कि.मी. अंतर