कामोठेत पायाभूत सुविधा कागदावरच

By Admin | Updated: March 19, 2016 00:59 IST2016-03-19T00:59:23+5:302016-03-19T00:59:23+5:30

‘बडा घर पोकळ वासा’ या उक्तीप्रमाणे सध्या कामोठा वसाहतीची स्थिती आहे. मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचाही याठिकाणी अभाव आहे. मुलांना खेळण्याकरिता क्रीडांगणे

Kamothat infrastructure is on paper | कामोठेत पायाभूत सुविधा कागदावरच

कामोठेत पायाभूत सुविधा कागदावरच

- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
‘बडा घर पोकळ वासा’ या उक्तीप्रमाणे सध्या कामोठा वसाहतीची स्थिती आहे. मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचाही याठिकाणी अभाव आहे. मुलांना खेळण्याकरिता क्रीडांगणे नाहीत, उद्याने नाहीत. एक विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे, मात्र तेही केवळ नावापुरतेच. सिडकोने या केंद्राचे उद्घाटन केले असले तरी सुशोभीकरण झाले नसल्याचे कामोठेकरांचे म्हणणे आहे.
सिडकोने नवीन पनवेल, कळंबोली, खारघरनंतर कामोठा नोड विकसित केला आहे. बहुतांशी सेक्टर हे सिडकोने वाटप केलेल्या साडेबारा टक्के भूखंडावर उभारण्यात आले आहेत. सुरुवातीपासूनच या वसाहतीला समस्यांचे ग्रहण लागले आहे. सांडपाणी, आरोग्य, पाणीपुरवठा आदी समस्यांबरोबरच खड्डेमय रस्त्यांमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. कामोठा नोडची लोकसंख्या दोन लाखांच्यावरती पोहचली असून रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. सध्या ४० टक्के पाणीकपात असून अनेक भागात पिण्यापुरते पाणी मिळत नाही. सिडकोने उद्याने, क्रीडांगणासाठी भूखंड राखीव ठेवले असले तरी अद्याप त्यांचा विकास केलेला नाही. याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी १८ मैदाने, १७ बगिचे नियोजित आहेत. मात्र त्यांच्या विकासासाठी सिडकोला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी कामोठेकरांना विरंगुळा म्हणून त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याकरिता एकही मैदान नाही. त्यांना त्यासाठी खारघर किंवा कळंबोली गाठावे लागते. अनेकदा लहान मुले रस्त्यावरच खेळत असल्याने रहदारीला अडथळा येतो, शिवाय मुलांच्या जीवालाही धोका उद्भवत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
कामोठे वसाहतीच्या नियोजनात १० सार्वजनिक शौचालयांची तरतूद आहे. परंतु अद्याप एकही शौचालय उभे न राहिल्याने फेरीवाले रस्त्यांवर शौचास बसत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. सामाजिक कार्यासाठी ११ जागा आरक्षित असून, सध्या हे भूखंड ओसाड पडले आहेत.

- सेक्टर २० मध्ये सिडकोने विरंगुळा केंद्र बांधले आहे. घाईघाईत त्याचे उद्घाटनही केले. मात्र प्रत्यक्षात या केंद्राचे काम अपूर्णच आहे. याठिकाणी झाडे लावण्यात आलेली नाहीत. लॉनचे कामही अपूर्ण आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले नाहीत. सेक्टर-१७ येथील विरंगुळा केंद्राचे कामही अपूर्ण आहे. मार्केटसाठी २१ जागा आरक्षित आहे. परंतु हा प्रस्ताव अजूनही कागदावरच असल्याने फेरीवाले रस्त्यावर, पदपथावर ठिय्या मांडून आहेत.

सध्या सुमारे आठ ते नऊ उद्यानांचे काम सुरू असून त्याचे सिव्हिल वर्कपूर्ण झाले आहे. हॉर्टिकल्चरची कामे सुरू करण्यात येणार आहेत. विरंगुळा केंद्र उभारण्यात येईल. या व्यतिरिक्त क्र ीडांगण विकसित करण्याचे आमचे नियोजन आहे, ते काम लवकर हाती घेवू.
- विलास बनकर,
कार्यकारी अभियंता, सिडको, कामोठे

कामोठे परिसराला सिडकोने सातत्याने सापत्न वागणूक दिली आहे. पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, याकरिता पंचायत समितीकडून वारंवार पत्रव्यवहार केले आहेत. मात्र सिडकोकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. आमच्या मुलांनी नेमके खेळायचे तरी कुठे?
- सखाराम पाटील, पंचायत समिती सदस्य.

चांगल्या सुविधा मिळतील म्हणून कामोठे येथे राहण्याकरिता आलो. सिडकोला साधे पिण्याचे पाणी सुध्दा मुबलक देता येत नाही. गार्डन आणि क्र ीडांगण तर दूरच राहिले त्यामुळे आम्हाला खारघर किंवा कळंबोलीत जावे लागते. इतक्या मोठ्या कॉलनीत एकही गार्डन नाही.
- उज्ज्वला आहेर, रहिवासी कामोठे.

मुलांना खेळण्याकरिता कामोठ्यात एकही मैदान नाही आमची मुले रस्त्यावर खेळतात किंवा चार भिंतींच्या आतमध्येच राहतात. एकीकडे तुम्ही स्मार्ट सिटीची घोषणा करता आणि दुसरीकडे मैदान सुध्दा उपलब्ध करून देत नाही.
- मंदा पागोरे, रहिवासी

विरंगुळ्याकरिता उद्यान, गार्डनची आवश्यकता आहे. धकाधकीच्या या युगात क्षणभर विश्रांती गरजेची आहेत. मात्र आमच्या वसाहतीत याचा अभाव आहे. सिडकोने केवळ स्वप्नच दाखवले.
- वैशाली वाफारे, रहिवासी, कामोठे.

Web Title: Kamothat infrastructure is on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.