कळंबोली सर्कल खड्ड्यांत
By Admin | Updated: July 30, 2015 23:53 IST2015-07-30T23:53:29+5:302015-07-30T23:53:29+5:30
अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने कळंबोली सर्कल परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे

कळंबोली सर्कल खड्ड्यांत
कळंबोली : अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने कळंबोली सर्कल परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
कळंबोली सर्कलला पनवेल-सायन, एनएच -४ , एनएच-४बी हे महामार्ग जोडले जातात. याच ठिकाणी स्टील मार्केट असल्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. जेएनपीटीकडे जाणारी मालवाहू वाहनेही कळंबोली सर्कलवरूनच जातात. सततच्या अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेसमोर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही, परिणामी अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एक स्कुटी घसरली, सुदैवाने यावेळी कुणी जखमी झाले नाही.
नवीन रस्ता तयार करताना पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते. मुंब्य्राकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळंबोली सर्कलला जोडणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने रस्त्याच्या दुरुस्तीस विलंब होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
कळंबोली सर्कल ते डी पॉइन्ट या दरम्यानच्या रस्त्याची अतिशय वाईट स्थिती निर्माण झाली आहे. नौपाडा गावाजवळ तर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेच, त्याचबरोबर वाहनांचे नुकसान होत असल्याचे बाळासाहेब जाधव या कंटेनर चालकाने सांगितले. (वार्ताहर)