एमआयडीसीमध्ये अनियमित पाणीपुरवठा : दिवाळीतच नवी मुंबईकरांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:46 AM2018-11-06T04:46:34+5:302018-11-06T04:46:56+5:30

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Irregular water supply in MIDC: Water congestion on Navi Mumbai in Diwali | एमआयडीसीमध्ये अनियमित पाणीपुरवठा : दिवाळीतच नवी मुंबईकरांवर पाणीसंकट

एमआयडीसीमध्ये अनियमित पाणीपुरवठा : दिवाळीतच नवी मुंबईकरांवर पाणीसंकट

googlenewsNext

नवी मुंबई - स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावरून स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.
नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेवून २४ तास पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. परंतु प्रत्यक्षात एमआयडीसी परिसराला अद्याप मोरबेचे पाणी पुरविण्यास सुरवात झालेली नाही. तुर्भे ते दिघापर्यंत लाखो नागरिकांना एमआयडीसीच्यावतीने पाणी देण्यात येत आहे. एमआयडीसीने शुक्रवारी शटडाउन घोषित केला असून शनिवार व रविवारी कमी दाबाने पाणी पुरविले जात आहे. माजी महापौर मनीषा भोईर यांनी स्थायी समितीमध्ये या विषयावर आवाज उठविला. श्रमिकनगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करत आहेत. अधिकाऱ्यांना याविषयी पाठपुरावा करून काहीच दखल घेतली जात नाही. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देविदास हांडे पाटील यांनीही एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याचे स्पष्ट केले. मोरबे धरणातील पाणी सर्व नवी मुंबई परिसराला मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात एमआयडीसीच्या शटडाउनमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनीही दिघा परिसरातील नागरिकांनाही गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी एमआयडीसी पाणी पुरवत नाही. शनिवार व रविवार कमी दाबाने पाणी येत असते. आठवड्यातून तीन दिवस पाणीच नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दिघा परिसरामध्ये जलकुंभ उभारण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एमआयडीसी परिसरातील नागरिकांना मोरबेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. परंतु अद्याप काम सुरू झाले नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पावले उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

जलकुंभाची गळती थांबवा
वाशी सेक्टर २ व ५ मधील जलकुंभाला गळती लागली आहे. या जलकुंभांची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनीही लवकरच या दोन्ही जलकुंभांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाईल असे आश्वासन दिले.

पहिल्या आंघोळीला पाणी मिळेल का?
नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करत असल्याचा दावा करते, परंतु प्रत्यक्षात एमआयडीसीमधील नागरिकांना गरजेपुरतेही पाणी उपलब्ध होत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले की, आठवड्यातील एक दिवस अजिबात पाणी मिळत नाही. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळते. किमान दिवाळीत पहिल्या आंघोळीसाठी तरी पाणी उपलब्ध होणार आहे का?

एमआयडीसीमधील झोपडपट्टी व इतर सर्व वसाहतींना मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाय करावे. दिवाळीमध्ये व नंतरही शहरवासीयांना पाणीटंचाई भासू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
- सुरेश कुलकर्णी,
सभापती, स्थायी समिती

श्रमिक नगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाणी मिळत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. आम्ही अधिकाºयांच्या ही गोष्टी निदर्शनास आणून दिली असून लवकरच पाणीप्रश्न सोडविण्यात यावा.
- मनीषा भोईर,
नगरसेविका, प्रभाग ४८

Web Title: Irregular water supply in MIDC: Water congestion on Navi Mumbai in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.