तुर्भेतील अघोरी प्रकाराची चौकशी सुरू

By Admin | Updated: June 25, 2016 02:08 IST2016-06-25T02:08:58+5:302016-06-25T02:08:58+5:30

तुर्भे नाका हनुमाननगरमधील अघोरी प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक व परिसरातील रहिवाशांकडून माहिती घेत आहे.

Inquiries of the Terror | तुर्भेतील अघोरी प्रकाराची चौकशी सुरू

तुर्भेतील अघोरी प्रकाराची चौकशी सुरू

नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमाननगरमधील अघोरी प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक व परिसरातील रहिवाशांकडून माहिती घेत आहे.
झोपडपट्टीच्या टेकडीवर असणाऱ्या घरामध्ये चार दिवसांपासून खड्डा खोदला जात होता. रोज रात्री घरामध्ये खड्डा करण्याचे काम सुरू केले जात होते. बुधवारी रात्री घरामध्ये पूजेचे साहित्य खड्ड्याजवळ ठेवले असल्याचे नागरिकांनी पाहिले. काहीतरी अघोरी प्रकार होत असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी घरामध्ये जावून विचारपूस करण्याचा प्रयत्न केल्यानंतर घरातील व्यक्तींनी निघून पलायन केले होते.
याविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शुक्रवारी पोलिसांनी त्या घरामध्ये जावून पाहणी केली. तेथील छायाचित्रेही घेतली आहेत. घरातील सदस्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलिसांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, घराच्या मूळ मालकाचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. ते आजारी असल्याने घरातच शौचास बसावे लागत होते. सर्व कचरा बाहेर जावून टाकणे दाट लोकवस्तीमुळे शक्य नसल्याने तो खड्डा करून त्यामध्ये टाकला जात होता, असे सांगितले आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली आहे. घरामधील वास्तव स्थितीची छायाचित्रे घेण्यात आली आहेत.
याविषयी वस्तुस्थिती तपासली असून या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. घरातील सदस्यांनी खड्ड्याविषयी दिलेले स्पष्टीकरण कितपत खरे आहे याचीही माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.(प्रतिनिधी)

Web Title: Inquiries of the Terror