वाढवणसाठी समुद्रामध्ये देशातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत; चार कंपन्यांत स्पर्धा
By नारायण जाधव | Updated: October 24, 2025 09:20 IST2025-10-24T09:19:47+5:302025-10-24T09:20:33+5:30
१०.७४ किलोमीटर लांबीची भिंत

वाढवणसाठी समुद्रामध्ये देशातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत; चार कंपन्यांत स्पर्धा
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक जेएनपीएने गती दिली आहे. यानुसार या पोर्ट परिसरात लाटा राेखण्यासाठी आणि संरचनात्मक ढाचा मजबूत होण्यासाठी खाेल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे. ती १०.७४ किलोमीटर लांबीची राहणार असून ती बांधण्यासाठी चार मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.
या कंपन्यांमध्ये अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सेमिंडिया प्रोजेक्ट्स (पूर्वी आयटीडी सिमेंटेशन) आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांचा समावेश आहे. तांत्रिक निविदा उघडल्यानंतर या चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत.
या कंपन्यांच्या तांत्रिक मूल्यांकनानंतरच आर्थिक निविदा उघडल्या जातील, ज्यामुळे सर्वात कमी किमतीचा निविदाकार ही भिंत बांधण्यासाठी पात्र ठरणार आहे. या निविदा ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रचालन व बांधकाम) मॉडेलवर अंतर्गत मागविल्या होत्या.