एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त
By नारायण जाधव | Updated: November 3, 2023 15:40 IST2023-11-03T15:40:01+5:302023-11-03T15:40:21+5:30
यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात एपीएमसीत व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे तोडून त्यांना दंड ठोठावला होता. मात्र, यास व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर अतिक्रमण काढणारे उपायुक्त राहुल गेठे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ही बदली होताच अनेक व्यापाऱ्यांनी आता पूर्वीपेक्षा दुपटीने मार्जिन स्पेसच नव्हे, तर समोरील पदपथांवरही अतिक्रमण करणे सुरू केले आहे. यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बुधवारी गेठे यांची बदली होताच गुुरुवारपासूनच व्यापाऱ्यांनी दिवाळीचे कारण पुढे करून शेड टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बांबू बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ते करताना पूर्वीपेक्षा दुप्पट मार्जिनल स्पेसवर काबीज केले आहे. एवढेच समोरील पदपथावर सामान ठेवण्यास सुरुवात केल्याचे एपीएमसीतील मर्चंट चेंबर इमारतीच्या परिसरात दिसले. यासाठी व्यापाऱ्यांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे काय, अशी विचारणा ‘लोकमत’ने नवी मुंबई महापालिकेचे तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांना छायाचित्रासह मेसेज पाठवून केली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अपघाताची शक्यता -
एपीएमसी परिसर नेहमीच गजबजलेला असतो. आता दिवाळी जवळ आल्याने परिसरात खरेदीसाठी महामुंबईतील ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे दुकानांसमोर वाहनांची गर्दी होत आहे. त्यातच अनेकांनी पदपथ काबीज केल्याने ग्राहकांसह पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही नाही. यामुळे रस्त्यावरून येजा करतांना अपघाताची शक्यता बळावली आहे.
एपीएमसीसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
परिसरात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे एपीएमसी प्रशासनाने कानाडोळा केला आहे. तसेच पदपथांवर व्यापारी सामान ठेवत असून, अनेकजण दुचाकीही पदपथांवर उभ्या करीत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.