कारच्या धडकेने विद्युत वाहिनीचा खांब झुकला; महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:22 IST2020-05-26T01:22:37+5:302020-05-26T01:22:43+5:30
मोठी दुर्घटना टळली

कारच्या धडकेने विद्युत वाहिनीचा खांब झुकला; महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू
नवी मुंबई : भरधाव कारने रस्त्यालगतच्या उच्च दाबाच्या वीज खांबाला धडक दिल्याची घटना पामबीच मार्गावर एपीएमसी येथे घडली. धडकेत खांब झुकल्याने वीजवाहिन्या रस्त्यालगत लटकत होत्या. सुदैवाने अपघातामध्ये थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
सोमवारी सकाळी पामबीच मार्गावर एपीएमसी येथे हा अपघात घडला. वाशीकडून कोपरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारचा अपघात झाला. या वेळी कार रस्त्यालगतच्या वीजखांबाला धडकली. त्यामुळे कारचेही प्रचंड नुकसान होऊन विद्युत वाहिनीचा खांब रस्त्याच्या दिशेने झुकला. जर हा खांब रस्त्यावर कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु अपघाताची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी कारमधील व्यक्ती आढळल्या नाहीत. त्यामुळे अपघात नेमका घडला कसा याची माहिती कळू शकली नसल्याचे एपीएसी पोलिसांनी सांगितले.
अपघातानंतर वीजपुरवठा खंडित करून संबंधित क्षेत्राला दुसºया ठिकाणाहून वीजपुरवठा करण्यात आला. वाकलेला खांब दुरुस्तीचे कामही त्वरित हाती घेण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचाही शोध घेतला जात असल्याचे एपीएमसी पोलिसांनी सांगितले.