Illegal garage on Palm Beach Road; Traffic congestion problem | पामबीच मार्गावरील बेकायदा गॅरेज; वाहतूककोंडीची समस्या
पामबीच मार्गावरील बेकायदा गॅरेज; वाहतूककोंडीची समस्या

नवी मुंबई : पामबीच मार्गावर एपीएमसी येथे मोठ्याप्रमाणात गॅरेजेस व वाहनांच्या सुट्ट्या भागांची विक्री करणारे दुकाने आहेत. या दुकानांच्या समोरच वाहने दुरूस्ती केली जातात. काही महिन्यापूर्वी महापालिकेने वाहतूक विभागाच्या सहाय्याने येथील अनधिकृत गॅरेजेस आणि स्पेअर पार्टस विक्रीच्या दुकानांवर कारवाई केली होती. मात्र कारवाईनंतर काही दिवसांतच येथील बाजार पुन्हा सुरू झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पामबीच मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा होत आहे.

पामबीच मार्गावर कोपरी सिग्नल ते वाशी ट्रक टर्मिनल या दरम्यान, अनेक शोरूम्स, हॉटेल्स, पामबीच गॅलेरियासारखे व्यापारी संकूल त्याशिवाय लहान मोठे व्यवसायिक गाळे आहेत. या व्यवसायिक गाळ्यांत वाहनांच्या सुट्ट्या भागांच्या विक्रीची दुकाने आहेत.
या दुकानांसमोरच बेकायदेशीर गॅरेजेस आहेत. विशेष म्हणजे या मार्गावरील हॉटेल्स आणि सर्वप्रकाच्या व्यवसायिक गाळ्यांना पामबीचच्या बाजुने प्रवेश नाही. मागच्या बाजुला असलेल्या सर्व्हिस रोडवर या गाळ्यांना प्रवेश आहे.

मात्र नियमधाब्यावर बसवून या मार्गावरील सर्व व्यवसायिकांनी पामबीचच्या दिशेने प्रवेश केले आहेत. त्यामुळे पामबीच मार्गावरील या पट्ट्यात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारीची दखल घेत महापालिकेचे माजी आयुक्त एन. रामास्वामी यांनी या मार्गावरील सर्व गाळ्यांना नोटीसा पाठवून कारवाई केली होती. तसेच पदपथ आणि रस्त्यांवर वाहनांच्या दुरूस्तीची कामे करता येवू नयेत, यादृष्टीने लोखंडी बॅरिकेड्स लावले होते. मात्र काही दिवसांतच हे बॅरिकेड्स गायब करून पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली.

गॅरेजेसचा हा पसरा पामबीचकडुन एपीएमसीकडे जाणाऱ्या मार्गावर सुध्दा पसरल्याने या मार्गावरील अवजड वाहनांना कसरत करावी लागत आहे.रस्त्यांच्या दोन्ही बाजुला अगदी मधोमध वाहने उभी करून दुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
 

Web Title: Illegal garage on Palm Beach Road; Traffic congestion problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.