खाडी क्षेत्रात बेकायदा बांधकामाचा धडाका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:32 IST2019-07-10T23:32:07+5:302019-07-10T23:32:11+5:30
रस्त्यावर साचते पाणी : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नाही

खाडी क्षेत्रात बेकायदा बांधकामाचा धडाका सुरूच
अरुणकुमार मेहत्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गालगत भंगारवाले, नर्सरी, गॅरेज त्याचबरोबर विविध वस्तू विक्री करणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामध्ये माहामार्गालगत असलेले नैसर्गिक नाले बुजवून टाकले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी मार्गच राहिला नाही. परिणामी, महामार्गावर पाणी येतेच त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातसुद्धा पाणी शिरत आहे. रस्ते विकास महामंडळाचे झालेले दुर्लक्ष यास कारणीभूत आहे.
पनवेल परिसरातून जाणाºया महामार्गापैकी मुंब्रा-पनवेल हा महत्त्वाचा महामार्ग आहे. येथून कळंबोली स्टील मार्केट, जेएनपीटी, पुणे, येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. मालवाहतुकीकरिता या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पावसाच्या दिवसात दुरवस्था होते. याचे कारण म्हणजे मुंब्रा महामार्गाचे नैसर्गिक नाले अतिक्रमणात बुजवण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत नाही. महामार्गावर पाणी साचल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्यांची चाळण होत आहे. पावसाचा जोर वाढल्याने महामार्गावरील पाणी कळंबोली गावात शिरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवारी खुटारी गावच्या हद्दीत महामार्गावर पाणी आले होते.
कळंबोली सर्कल ते कल्याण फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात भंगारवाले, गॅरेज, नर्सरी, ढाबा, हॉटेल, पी ओपी, यांनी महामार्गालगत अतिक्रमण केले आहे. त्यात काही ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवले आहेत. तर ढाब्याच्या ठिकाणी गाड्या पार्किंगसाठी भराव करण्यात येत आहे. कळंबोली सर्कलजवळ भंगारवाले तसेच गॅरेजवाल्याने नाला बुजवून त्यावर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणावर कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस या ठिकाणी गॅरेज आणि भंगारवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. रस्ते विकास महामंडळाकडून आपत्ती व्यवस्थापनातर्गंत पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
आम्ही गाड्या खरेदी करताना रोड टॅक्स भरतो, त्याचबरोबर पनवेल मुंबई महामार्गावर पथकरसुद्धा देतो, असे असताना पावसाळ्यात या ठिकाणी दुरवस्था होते आणि त्याचा त्रास वाहतूकदारांना सहन करावा लागत लागतो, अशी प्रतिक्रिया अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष गोविंद साबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पनवेल-मुंब्रा महामार्गाची आम्ही दोन दिवसाअगोदर पाहणी केली आहे. महामार्गालगतचे भंगारवाले, गॅरेज यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार आहे. बुजवलेले नालेसुद्धा लवकरच काढण्यात येणार आहेत.
- शंकर सावंत, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ