अवैध शस्त्र : केडीएमसीचे नगरसेवक गायकवाड अटकेत

By Admin | Updated: July 30, 2015 00:36 IST2015-07-30T00:36:51+5:302015-07-30T00:36:51+5:30

बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये कल्याण - डोंबिवली महापालिकेचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे.

Illegal Arms: KDMC Corporator Gaikwad Attache | अवैध शस्त्र : केडीएमसीचे नगरसेवक गायकवाड अटकेत

अवैध शस्त्र : केडीएमसीचे नगरसेवक गायकवाड अटकेत

नवी मुंबई : बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये कल्याण - डोंबिवली महापालिकेचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे. महापालिकेच्या येत्या निवडणुकीत विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पिस्तूल खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे.
महेंद्र गायकवाड सलग दोनदा निवडून आला आहे. त्यामुळे आपल्याला प्रतिस्पर्ध्यांकडून भीती होती. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडेही अवैध शस्त्रे असल्याने असुरक्षित वाटत होते. त्यामुळे आपणही सोबत पिस्तूल बाळगल्याची कबुली गायकवाड याने दिली. अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेले तिघे व खरेदीसाठी आलेले दोघे अशा पाच जणांना तुर्भे पोलिसांनी गेल्या आठवड्यात पकडले. त्यांच्याकडून सहा पिस्तूल, १३ मॅगझीन, ८९ काडतुसे व गुन्ह्णासाठी वापरलेल्या दोन कार असा मुद्देमाल जप्त केला होता. अर्शद शफी अन्वर अहमद (२४), दानिश समशाद अली (२३) व मोहम्मद अनस जमिल अहमद (२३), सचिन गोस्वामी (३६) व संतोष खोसे अशी त्यांची नावे आहेत. सचिन व संतोष हे पिस्तूल खरेदीसाठी पुण्याहून नवी मुंबईत आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान कुरकानअली त्यागी (४७) हा पोलिसांच्या हाती लागला. त्याला मेरठ येथून अटक केली असून तोच अवैध शस्त्रे पुरवायचा, असे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्याच्याकडूनही पोलिसांनी एक विनापरवाना पिस्तूल जप्त केले. कुरकानअलीनेच कल्याण - डोंबिवलीचे नगरसेवक महेंद्र गायकवाड यालाही शस्त्र विकल्याची माहिती चौकशीदरम्यान तुर्भे पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने गायकवाड याच्यासह सुधीर जाधव या त्याच्या मावस भावाला अटक केली. सुधीर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे. त्यानेच कुरकानअलीला संपर्क साधून ५५ हजार रुपयांना अवैध पिस्तूल खरेदी करून दिले होते.

पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या सचिन गोस्वामी याने लोणावळा येथे पब व क्लबसाठी जमीन खरेदी केली आहे. त्याठिकाणी पब चालवत असताना कोणाचा अडथळा नको यासाठी त्याने हे पिस्तूल घेतले होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे व तपास पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Illegal Arms: KDMC Corporator Gaikwad Attache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.