एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 05:40 IST2025-01-14T05:40:07+5:302025-01-14T05:40:24+5:30
सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत
नवी मुंबई : पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई शहरात घर असेल तर सिडकोचे घर घेता येत नाही, असा सिडकोचा नियम आहे. मात्र, या नियमात बदल करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तसे संकेत दिले आहे.
सिडकोच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. विशेष म्हणजे सिडकोचे घर घेण्यासाठी अनेक अटी व शर्ती लागू आहेत. पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई शहरात घर असेल तर सिडकोचे घर घेता येत नाही, ही प्रमुख अट सर्वसामान्यांना जाचक ठरत आहे.
कुटुंब वाढल्यानंतर दुसऱ्या घराची गरज भासते; परंतु खासगी प्रकल्पांत घर घेणे परवडत नाही. अशावेळी सिडकोचे घर आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरते. मात्र, सिडकोच्या नियमानुसार दुसरे घर घेता येत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही अट शिथिल करण्याचा निर्णय शिरसाट यांनी घेतला आहे त्यामुळे पूर्वीचे एक घर असले तरी आता सिडकोचे दुसरे घर घेता येणार आहे.
हजारो कुटुंबीयांना मिळणार दिलासा
सध्या सिडकोच्या २६ हजार घरांची योजना सुरू आहे. एका घराच्या अटीमुळे अनेकांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केलेली नाही. ती शिथिल झाल्यास दुसऱ्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोच्या घरांची विक्रीसुद्धा वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.