न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन धर्तीवर नवी मुंबईत‘आयकॉनिक इनडोअर अरेना’;‘सिडको’ने मागविल्या निविदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:30 IST2025-12-08T09:30:28+5:302025-12-08T09:30:39+5:30
करमणूक क्षेत्रात नवीन मानदंड निर्माण करणारा देशातील पहिला प्रकल्प

न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन धर्तीवर नवी मुंबईत‘आयकॉनिक इनडोअर अरेना’;‘सिडको’ने मागविल्या निविदा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे जागतिक दर्जा प्राप्त झालेल्या नवी मुंबईच्या लौकिकात आता आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेनाची भर पडणार आहे. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनच्या ओटू अरेना धर्तीवर हा अरेना बांधला जाणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प ठरणार असून, त्यादृष्टीने सिडकोने प्राथमिक स्तरावर कार्यवाही सुरू केली आहे.
इनडोअर अरेनामध्ये २० हजार बसण्याची आणि २५ हजार उभ्या प्रेक्षकांची क्षमता असणार आहे. संगीत मैफली, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, मोठे सांस्कृतिक महोत्सव आणि अत्याधुनिक आभासी अनुभवांच्या आयोजनासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. हा अरेना देशातील करमणूक क्षेत्रात नवीन मानदंड निर्माण करणार असेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. विशेषत: दळणवळणाच्या सक्षम यंत्रणा निर्माण करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक, हाय-स्पीड रेल्वे, मेट्रो, ऐरोसिटी, लॉजिस्टिक पार्क, एज्युसिटी, मेडिसिटी या प्रकल्पांमुळे नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नेरूळ जेट्टीमुळे पर्यटन व चित्रपट निर्मिती क्षेत्राला चालना मिळत आहे, तर खारघरमधील सेंटर ऑफ एक्सलन्स आणि गोल्फ कोर्स नवी मुंबईच्या क्रीडा-करमणूक ताकदीत भर घालतात. यात आता लाईव्ह एंटरटेनमेंट अरेनाची भर पडणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
रोजगारनिर्मितीसह पर्यटन क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध
उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित भागीदारांबरोबर हातमिळवणी करून जागतिक दर्जाचे ज्ञान, व्यवस्थापन आणि परिचालन क्षमता आणण्याची सिडकोची योजना आहे. अरेनामुळे रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, नवीन उद्योगसंभावना आणि थेट करमणूक क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
दरम्यान, अरेना उभारण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती अर्थात इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यासाठी ९ डिसेंबरपासून ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा सादर करण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र म्हणून दर्जा प्राप्त होणार आहे. अरेना हा त्यादृष्टीने उचलले महत्त्वाचे पाऊल आहे. हा अरेना सांस्कृतिक व आर्थिक क्रांतीचा पाया ठरेल. त्यामाध्यमातून जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांसाठी खुली होणार असून कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांना मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील.
विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको