पोलिसठाण्याबाहेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 4, 2023 20:01 IST2023-06-04T20:01:31+5:302023-06-04T20:01:38+5:30
पत्नीवरील अतिप्रसंगाची तक्रार देताना घडला प्रकार.

पोलिसठाण्याबाहेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
नवी मुंबई : पत्नीची अतिप्रसंगाची तक्रार घेण्यास पोलिस चालढकल करत असल्याच्या संशयातून पतीने पोलिसठाण्याबाहेरच विषप्राशन केल्याची घटना शनिवारी रात्री रबाळे पोलिसठाण्याबाहेर घडली. यावेळी पतीला तातडीने रुग्णालयात नेल्याने प्राण वाचले असून प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नात्यातल्याच एका व्यक्तीने आपल्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार देण्यासाठी एक महिला पतीसह रबाळे पोलिसठाण्यात आली होती. यावेळी महिलेचा पती इतर एका व्यक्तीसोबत पोलिसठाण्याबाहेर बोलत उभे होते. काही वेळातच त्यांनी त्यांच्याकडे असलेले विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यामुळे त्याचे प्राण वाचले असून प्रकृती चिंताजनक आहे. पत्नीची तक्रार घेण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा त्यांचा आरोप होता. यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी गैरसमजुतीमधून विषप्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच शनिवारी रात्रीच महिलेच्या तक्रारीवून गुन्हा दाखल असून संबंधिताला अटक केले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.