Husband's companion in future wife's illness | भावी पत्नीच्या आजारपणात पतीची साथ; मदतीसाठी सामाजिक संस्थांना आवाहन

भावी पत्नीच्या आजारपणात पतीची साथ; मदतीसाठी सामाजिक संस्थांना आवाहन

पनवेल : हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची अनेक प्रकरणे आपल्या कानावर पडत असतात. लग्नानंतर मुलीसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार समाजात आजही पाहावयास मिळत असताना पनवेलमधील हरिग्राम येथे राहणाऱ्या विजय मोरे या तरुणाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

अश्विनी पंढरीनाथ शेळके (२६) या तरुणीसोबत जमलेल्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिचे फुप्फुस निकामी झाल्याची गंभीर बाब समोर आली. मात्र, विजय आपल्या भावी पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

२०१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात विजय व अश्विनीचे लग्न जमले. लग्नाची तारीख निश्चित होण्यापूर्वी अश्विनीला निमोनियाचा त्रास सुरू झाला. हा आजार बळावल्याने शेळके कुटुंबीय आणि विजयने अश्विनीला नामांकित डॉक्टरांकडे नेले. या वेळी जानेवारी २०१९ मध्ये तिचे फुप्फुस निकामी झाल्याचे निदान समोर आले. पेशाने आयटी इंजिनीअर असलेल्या विजयसह शेळके कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला. मात्र, विजयने भावी पत्नीची साथ न सोडता तिला धीर दिला. फुप्फुस प्रत्यारोपणासाठी सुमारे ३५ तर ४० लाखाचा खर्च येणार आहे. याकरिता स्वत: विजय निधी गोळा करण्यासाठी विविध ट्रस्टच्या पायºया झिजवत आहे. अद्याप सुमारे ४० ते ५० संस्थांकडे त्याने मदत मागितली आहे. आठवड्यातून एकदा अश्विनीला डॉक्टरांकडे तपासणी करिता घेऊन जावे लागते. याकरिता स्वत: विजय शेळके कुटुंबीयांसोबत रुग्णालयात जातो. अश्विनी ठाणे येथील लोकमान्यनगर येथे राहते. तर विजय हे पनवेलमधील हरिग्राम या ठिकाणी वास्तव्यास आहेत. सध्या अश्विनी सुकापूर येथे भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्या ठिकाणी तिला कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

लग्न जमण्यापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. मात्र, अवघ्या तीन महिन्यांत आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. तिच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. अश्विनीच्या उपचारासाठी संस्थांनी मदतीचा हात द्यावा, अशी विनंती विजय करीत आहे.

फुप्फुस प्रत्यारोपणासाठी येणार खर्च ३५ ते ४० लाखांच्या घरात आहे. हे आमच्यासाठी खूप जास्त असल्याने आम्ही अनेक ट्रस्टकडे धाव घेतली आहे. ट्रस्टने याकरिता आम्हाला मदत करावी.
- विजय मोरे, अश्विनीचा भावी पती

Web Title: Husband's companion in future wife's illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.