उद्योगांच्या भरभराटीतून बागायती शेती भुईसपाट
By Admin | Updated: November 15, 2014 23:00 IST2014-11-15T23:00:33+5:302014-11-15T23:00:33+5:30
कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत.

उद्योगांच्या भरभराटीतून बागायती शेती भुईसपाट
शौकत शेख ल्ल डहाणू
डहाणूपासून केवळ 25 कि. मी. अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव औद्योगिक वसाहतीतील वाढते उद्योग रोजगार निर्मितीसाठी पर्वणी ठरत असल्याने शिवाय कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. त्यामुळे या परिसरातील शेती बागायतीसाठी मजुरांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी उद्योगधंद्याची भरभराट होत असून शेती, बागायती व्यवसाय भुईसपाट होण्याची वेळ आली असल्याचे मत वाढवण येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
डहाणू तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे सांगुन केंद्र शासनाने सन 1991 ला या परिसरात उद्योगबंदी लादली. या उद्योगबंदीमुळे सुशिक्षितबेकार तरूणांना रोजगार मिळू शकत नाही. तर लघु उद्योगांना पुर्णत: बंदी असल्यामुळे मोलमजुरी करणा:या आदिवासी कामगारांच्या कुटूंबाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे दरवर्षी रोजगारासाठी हजारो आदिवासी स्थलांतर करीत असत. परंतु गेल्या एक वर्षापासून डहाणूच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव येथे कापड, पेन्सिल, पेन, होजियरी चे शेकडो कारखाने सुरू झाल्याने डहाणू, तलासरी, तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कामगार तेथे जाऊ लागले आहे.
विशेष म्हणजे येथील कारखानदार कामगारांना येण्याजाण्यासाठी डहाणू, तलासरीसाठी वाहन उपलब्ध करून देत असल्याने शेती, बागायती, विटभट्टी तसेच बोटीत जाणारे मजुर दररोज उंबरगाव येथील कारखान्यात जाताना दिसत आहे. दररोज उंबरगाव येथून पंधरा ते वीस आरामबस डहाणूच्या विविध भागात महिला तसेच पुरूषांना कामावर घेऊन जात असल्याने या भागातील शेती, बागायती करणो हा चिंतेचा विषय बनू लागला आहे.
दरम्यान डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, तणासी, वानगांव, डेहणो, साखरे, आसनगांव, चंडिगाव, डहाणू इ. भागात मोठ मोठय़ा बागायती असून या परिसरात पावसाळ्यात शेती तर त्यानंतर मिरची, भोपली, वांगी, भेंडी, दुधीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात या भागाचा पहिला नंबर आहे. दररोज येथून शेकडो टन भाजीपाला मुंबईच्या मुख्य बाजारपेठेत जात असतो. परंतु दिवसेंदिवस मजुर टंचाईमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.