होल्डिंग पाँडचे अस्तित्वच धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 04:58 IST2016-08-20T04:58:32+5:302016-08-20T04:58:32+5:30
भरतीचे पाणी शहरात येवू नये यासाठी शहरात खाडीकिनारी ११ होल्डिंग पाँड बांधले आहेत. परंतु मँग्रोज व गाळामुळे पाँडचा आकार कमी होत चालला आहे. मँग्रोजमुळे साफसफाई करण्यामध्ये

होल्डिंग पाँडचे अस्तित्वच धोक्यात
- नामदेव मोरे, नवी मुंबई
भरतीचे पाणी शहरात येवू नये यासाठी शहरात खाडीकिनारी ११ होल्डिंग पाँड बांधले आहेत. परंतु मँग्रोज व गाळामुळे पाँडचा आकार कमी होत चालला आहे. मँग्रोजमुळे साफसफाई करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. दहा वर्षांपासून सदर विषय न्यायालयात प्रलंबित असून याविषयी वेळेत मार्ग निघाला नाही तर भविष्यात मोठी भरती आल्यास पाणी शहरात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई शहर समुद्र भरतीच्या उच्च पातळीच्या खाली वसले आहे. भरतीमुळे पूर आल्यास शहराचे नुकसान होवू नये यासाठी सिडकोने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून ११ ठिकाणी होल्डिंग पाँड तयार केले आहेत. या पद्धतीमध्ये पाण्याच्या सर्वात उंच पातळीवर बंधारे बांधणे जेणेकरून भरतीचे पाणी आत शिरकाव करण्यास प्रतिबंध होवू शकतो.
डच डाईक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बांधकामांमध्ये बंधारे भिंतीच्या दिशेने एक दिशा असलेले फ्लॅप गेट बसविले जाते. यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत येण्यास प्रतिबंध होतो. फक्त ओहोटीच्यावेळी ही दारे उघडली जातात. यामुळे पृष्ठभागावरील पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होतो. सद्यस्थितीमध्ये बेलापूरमध्ये २, वाशीमध्ये ५, कोपरखैरणेमध्ये १, ऐरोलीमध्ये २ व सानपाडामध्ये १ होल्डिंग पाँड आहे. २०० हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. धारण तलाव हे खाडी क्षेत्र व जमीन यामधील दुवा आहेत. लाटांच्या प्रभावामुळे धारण तलाव परिसरात खाडीचे पाणी येत असते. या पाण्याबरोबर मँग्रोजचे बीही वाहून येते व झपाट्याने मँग्रोजची वाढ होत असते. मँग्रोजमुळे धारण तलाव साफ करता येत नाही. परिणामी त्यांच्यामधील गाळ दिवसेंदिवस वाढत असून समुद्राला मोठी भरती आल्यास शहरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गाळ व मँग्रोजमुळे धारण तलावांची क्षमता ८० टक्के कमी झाली आहे. महापालिकेने १८ डिसेंबर २००५ मध्ये धारण तलावाच्या दुरुस्ती कामकाजाबाबत याचिका दाखल केलेली आहे. २००६ मध्ये सुनावणी दरम्यान चार प्रकारच्या कामांना परवानगी दिली आहे. यामध्ये नवी फ्लॅप गेटची उभारणी, बंडची दुरुस्ती व यंत्राची ने-आण करण्यासाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती करणे. किरकोळ दुरुस्ती व वाहिनीच्या दुरुस्तीचे काम , फ्लॅप गेटची दुरुस्ती. सन २०१० मध्ये उच्च न्यायालयाने न्यायालयात अर्ज करण्यापूर्वी तलावातील गाळ उपासण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या एमसीझेडएमए कडे आवश्यक परवानगीकरिता पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेने २०१२ मध्ये एमसीझेडएमएकडे अर्ज केला असून मार्च २०१३ मध्ये कृती आराखडा मंजूर केला आहे.
होल्डिंग पाँडमधून काढलेल्या गाळाचा वापर मँग्रोजच्या रोपवाटिकांसाठी करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात गाळ काढण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत.
तलाव तयार केल्यानंतर मँग्रोज वाढले
सिडकोने धारण तलाव केले तेव्हा त्यामध्ये मँग्रोज नव्हते. भरतीच्या पाण्याबरोबर मँग्रोजच्या बिया तलावात आल्या व ८० टक्के जागा व्यापली आहे. वास्तविक योग्य वेळी तलावांमधील गाळ काढला नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
पाठपुरावा करण्यात अपयश
पनवेलजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी शेकडो एकर मँग्रोज काढून दुसरीकडे लागवड केली जाणार आहे. गाढी व उलवे नदीच्या पात्रामध्ये बदल करावा लागणार आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यावरही परिणाम होणार आहे. यानंतरही विमानतळासाठी सर्व परवानग्या युद्धपातळीवर मिळविल्या जात आहेत. परंतु धारण तलावांची साफसफाई करण्यासाठी १० वर्षांत परवानगी मिळविता येत नाही. यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली असून पूर येवून जीवित व वित्त हानी झाल्यानंतर तलावांमधील गाळ काढणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
वाशी परिसराला सर्वाधिक धोका
मोठी भरती आल्यास त्याचा सर्वाधिक फटका वाशी परिसराला बसणार आहे. या परिसरात पाच धारण तलाव असून सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मँग्रोज वाढल्यामुळे साफसफाई करता येत नाही. कलश उद्यानसमोर सेक्टर १२ च्या होल्डिंग पाँडचे क्षेत्रफळ २४ हेक्टर आहे. परंतु त्याला पूर्णपणे मँग्रोजचा विळखा पडला आहे. येथील गाळ काढला नाही तर भविष्यात पाणी शहरात घुसून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाँडच्या साफसफाईसाठी केलेले प्रयत्न
- १८ डिसेंबर २००५ मध्ये दुरुस्तीसाठीची याचिका दाखल
- २००६ मध्ये चार प्रकारची कामे करण्यास मंजुरी
- २०१० मध्ये न्यायालयाने एमसीझेडएकडे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या
- ३० आॅगस्ट २०१२ मध्ये पालिकेने एमसीझेडएमकडे अर्ज केला
- ४ मार्च २०१३ रोजी कृती आराखडा मंजूर करण्यात आला
- ५ आॅगस्ट २०१३ मध्ये पाँडमधून काढलेला गाळ दगडखाणींमध्ये टाकता येईल असा अर्ज केला
होल्डिंग पाँडचा तपशील
नोड क्षेत्र (हेक्टर)
बेलापूर सेक्टर १२५.५
बेलापूर सेक्टर १५ए१३.८५
वाशी सेक्टर ८ ए २.३
वाशी गाव १.९३
वाशी सेक्टर १०ए १५
वाशी, सेक्टर १२२४
कोपरखैरणे सेक्टर १४९
ऐरोली सेक्टर १८१६
ऐरोली सेक्टर १९१४
वाशी रेल्वे स्टेशन७७
सानपाडा सेक्टर ३०ए२२
एकूण २००.५८