‘आत्मक्लेश’मध्ये उच्चशिक्षित तरुणांचाही सहभाग
By Admin | Updated: May 29, 2017 06:41 IST2017-05-29T06:41:24+5:302017-05-29T06:41:24+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसोबत उच्चशिक्षित तरुणही सहभागी झाले आहेत

‘आत्मक्लेश’मध्ये उच्चशिक्षित तरुणांचाही सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसोबत उच्चशिक्षित तरुणही सहभागी झाले आहेत. टॅब व स्मार्ट फोनच्या आधारे ही तरुणाई आंदोलनाचा प्रत्येक क्षण टिपून राज्यभरातील शेतकरी व कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवत आहे. तरुणाईसोबत कोल्हापूरमधील डॉक्टरांचे पथकही आंदोलनात सहभागी झाले असून मोफत उपचार देवून शेतकऱ्यांना लढण्याचे बळ देत आहेत.
आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाच हजार शेतकरी रविवारी दुपारी वाशीतील जागृतेश्वर मंदिरामध्ये क्षणभर विश्रांतीसाठी थांबले. नवी मुंबईकरांनी दिलेली भाजी भाकरी खावून पुन्हा विधानभवनाकडे रवाना झाले. आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची व सुशिक्षित तरुणांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली आहे. हर्षद पाटील हा शिरोळमधील अभियंता असलेला तरुण त्याचे वडील व भावासोबत आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आग्रहीपणे तो मांडत असून आपल्या ज्ञानाचा उपयोग चळवळीसाठी करू लागला आहे. टॅब व स्मार्ट फोनचा वापर करून आंदोलनातील प्रत्येक घटनेचे छायाचित्र टिपत असून तो राज्यभर पसरलेल्या स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहे. राजू शेट्टी यांची खालावलेली प्रकृती यापासून रॅलीतील प्रत्येक घडामोड काही क्षणात राज्यभर पोहचवत आहे. त्याच्याबरोबर इतरही अनेक तरुण त्यांच्यापरीने योगदान देत आहेत.
तीव्र उकाड्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी व खासदार राजू शेट्टी यांचीही प्रकृती खालावू लागली आहे. शेट्टी यांच्या पायाला फोडी आल्या आहेत. त्यांना चालण्यासही त्रास होत आहे. रक्तदाब कमी जास्त होवू लागला आहे. गुडघेदुखीनेही त्रस्त आहेत. त्यांची दिवसातून तीन वेळा वैद्यकीय तपासणी करावी लागत आहे. औषधांसोबत लिंबू पाणी व इतर रस दिला जात आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय आंदोलक शेतकऱ्यांवरही मोफत उपचार केले जात
आहेत.
नवी मुंबईकरांनी केले स्वागत
आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे नवी मुंबईकरांनीही स्वागत केले. जिल्हा काँगे्रस अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँगे्रसचे निशांत भगत यांनी जागृतेश्वर मंदिरामध्ये आंदोलकांची भेट घेतली. सर्वांना जेवणाची व क्षणभर विश्रांती घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूरमधील नागरिकांनीही शेतकऱ्यांची व शेट्टी यांची भेट घेवून लढ्यास पाठिंबा दिला.
जयसिंगपूर मेडिकल ट्रस्टच्यावतीने आत्मक्लेश आंदोलनातील सहभागी शेतकरी व राजू शेट्टी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोज दोन डॉक्टरांचे पथक पाठविले जात आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या हेतूने सर्व जण नि:स्वार्थपणे सहभागी होत आहेत. स्वाभिमानीच्या इतर ठिकाणच्या आंदोलनामध्येही आम्ही सहभागी होत असतो.
- डॉ. जयवर्धन मरजे व डॉ. किरण पाटील
स्वाभिमानीच्या प्रत्येक लढ्यात आमचे पूर्ण कुटुंब सहभागी होत असते. आत्मक्लेश आंदोलनादरम्यानची प्रत्येक घटना कॅमेऱ्यातून टिपून ते राज्यभरातील कार्यकर्ते व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. आपल्या पद्धतीने आंदोलनामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.
- हर्षद पाटील, मेकॅनिकल इंजिनीअर
आंदोलनाच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी विविध संघटना शेतकऱ्यांची भेट घेवून मनोबल वाढवत आहेत. लोकांचे प्रेम मिळत आहे पण सरकारला मात्र जाग येत नाही. पण आम्ही मागे हटणार नसून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवला जाईल.
- बाबा सांदरे, शेतकरी