महामार्गालगत औषध-गोळ्यांचा खच
By Admin | Updated: December 8, 2015 00:59 IST2015-12-08T00:59:31+5:302015-12-08T00:59:31+5:30
पनवेल-सायन महामार्गालगत कामोठे टोलनाक्याजवळ अज्ञात व्यक्तीने वापरायोग्य नसलेली गोळ्या, औषधे रस्त्यालगत टाकली आहेत

महामार्गालगत औषध-गोळ्यांचा खच
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गालगत कामोठे टोलनाक्याजवळ अज्ञात व्यक्तीने वापरायोग्य नसलेली गोळ्या, औषधे रस्त्यालगत टाकली आहेत. यामुळे नागरिकांच्या तसेच गुरांच्या आरोग्यास धोका उद्भवण्याची शक्यता असून, ही औषधे त्वरित उचलण्यात यावीत आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, आशी मागणी परिसरातील नागरिकांकडून आहे.
कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात दवाखाने, रुग्णालये आणि मेडिकल्स आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र कचरा उचलण्यासाठी पैसे लागत असल्याने काही रुग्णालये आणि डॉक्टर बायो मेडिकल वेस्ट कचराकुंडीत टाकतात. सिडकोकडूनही याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याने मेडिकल वेस्ट मिळेल त्या जागेवर डम्प करण्यात येत आहे. औषध विक्रेत्यांकडूनही मुदत संपलेली औषधेही कचऱ्यात टाकण्यात येत आहेत.
कामोठे वसाहतीतून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने पुढे बाजूला रात्रीच्या वेळी अशा प्रकारचा कचरा टाकला जात आहे. खाडीप्रवण क्षेत्र असल्याने त्यामध्ये जलचर आहेत. मात्र अशा प्रकारे औषध तिथे टाकल्याने जलचरांवरसुद्धा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यापूर्वी मानसरोवरजवळ भूखंडावर अशाच प्रकारे औषधे डम्प करण्यात आली होती. रहिवाशांनी सिडकोकडे तक्रारी केल्यानंतर ही औषधे उचलण्यात आली. मात्र संबंधित औषध टाकणाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. (वार्ताहर)