वातावरणातील बदलामुळे ‘ताप’

By Admin | Updated: March 21, 2017 02:15 IST2017-03-21T02:15:50+5:302017-03-21T02:15:50+5:30

वातावरणात झालेला बदल व डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात तापाचा जोर वाढला आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी वाजत असल्यामुळे

'Heat' due to climate change | वातावरणातील बदलामुळे ‘ताप’

वातावरणातील बदलामुळे ‘ताप’

नवी मुंबई : वातावरणात झालेला बदल व डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात तापाचा जोर वाढला आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी वाजत असल्यामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे दवाखान्याबाहेरच्या रांगा वाढल्या आहेत.
राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात बदल झाला असून नवी मुंबईतही तो जाणवत आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे कामानिमित्ताने घराबाहेर निघणाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी थंडीची लाट सुटत असल्यामुळे नागरिकांना एकाच दिवसामध्ये दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. परंतु त्याचा परिणाम प्रकृतीवर होत असल्यामुळे अनेक जण सर्दी, तापाने ग्रासले आहेत. त्यापैकी अनेकांना घशाचे देखील त्रास जाणवत आहेत. अशातच शहरातल्या अनेक विभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये खाडीलगतच्या भागांचा अधिक समावेश आहे. खारफुटीमध्ये वाढलेले हे डास संध्याकाळच्या वेळी लोकवस्तीमध्ये घुसत असल्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. सर्दी-तापाने ग्रासलेला प्रत्येक जण रुग्णालयात जावून आपल्याला मलेरिया तर नाही झाला ना? याची खात्री करून घेत आहेत. यामुळे रुग्णालयांबाहेरच्या रांगा वाढत चालल्या असून त्यात पालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर धुरीकरण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषत्वाने उद्यानालगतच्या रहिवासी भागात संध्याकाळच्या वेळी मच्छरांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या रहिवाशांकडून धुरीकरणाची मागणी होत आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ व लगतच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे. उघडी गटारे ही देखील त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. परंतु धुरीकरणाची मागणी करूनही पालिकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी संपत घोलप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Heat' due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.