आरोग्य सेवा कोलमडली

By Admin | Updated: April 23, 2016 02:10 IST2016-04-23T02:10:16+5:302016-04-23T02:10:16+5:30

सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने आदिवासी बांधव व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा ही विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहे.

Health service collapses | आरोग्य सेवा कोलमडली

आरोग्य सेवा कोलमडली

विनोद भोईर,  पाली
सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने आदिवासी बांधव व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा ही विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. तसेच तालुक्यात पाली, जांभुळपाडा असे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व १४ उपआरोग्य केंद्रे आहेत, परंतु निम्म्याहून अधिक केंद्रे पाणी नसल्याने बंद आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा आरोग्य सेवेलाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. सुरु असलेल्या केंद्रामध्येही सुविधांचा अभाव तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा कोलमडली आहे, यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त के ला जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे रात्री सेवा उपलब्धच नसते. काही ठिकाणी औषधांचाही तुटवडा आहे तर पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी काही दिवस रजेवर गेले असल्याने तालुक्यातील रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी हे पुढील शिक्षणासाठी बाहेर गेल्याने ते पद ही रिक्त आहे. तसेच एक आरोग्य सेविका, एक वैद्यकीय अधिकारी आदि पद पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी आहेत तर तालुक्यातील उपकेंद्र उध्दर, आपटवणे, राबगांव, सिध्देश्वर, पेडली, हातोंड येथे आरोग्य सेवक, सेविकांचे पद रिक्त आहे.
राबगांव उपकेंद्र कित्येक वर्षे भाड्याच्या जागेत सुरु आहे. इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गेली दोनवर्षे निधी परत जात आहे. पेडली उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली, परंतु ती शासनाने ताब्यात घेतली नाही. कारण ती इमारत खासगी मालकाच्या जागेत त्यांची कोणतीही परवानगी न घेता बांधली आहे. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे. निवासाची सोय असूनही या ठिकाणी अधिकारी राहत नाही. त्यामुळे तेथे रात्रीची सेवा मिळत नाही.

Web Title: Health service collapses