आरोग्य अधिकारी पत्तीवार यांची स्वेच्छानिवृत्ती

By Admin | Updated: June 28, 2016 02:10 IST2016-06-28T02:10:05+5:302016-06-28T02:10:05+5:30

महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांनी पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

Health officer leaves his voluntary retirement | आरोग्य अधिकारी पत्तीवार यांची स्वेच्छानिवृत्ती

आरोग्य अधिकारी पत्तीवार यांची स्वेच्छानिवृत्ती


नवी मुंबई : महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांनी पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तशा आशयाचा अर्ज त्यांनी महापालिका आयुक्तांकडे सादर केल्याचे समजते.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका सुरू केला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे. तर कामात अनियमितता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. त्याचबरोबर वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय बदल्या केल्या आहेत. एकूणच आयुक्त मुंढे यांच्या या बेधडक कार्यप्रणालीचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
डॉ. संजय पत्तीवार यांच्या कार्यप्रणाली नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. असे असतानाही प्रशासनाने मुख्य वैद्यकीय पदावरून त्यांची थेट महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. परंतु आयुक्त मुंढे यांनी अलीकडेच पत्तीवार यांची ही नियुक्ती बेकायदा ठरवत त्यांची पुन्हा मूळ पदावर नियुक्ती केली आहे.
गेल्या आठवड्यातील स्थायी समितीत नगरसेवक एम.के. मढवी यांनी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचत या परिस्थितीला सर्वस्वी डॉ. पत्तीवार हेच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत आयुक्त मुंढे यांनी संपूर्ण आरोग्य विभागासह डॉ. पत्तीवार यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच डॉ. पत्तीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात डॉ. पत्तीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Health officer leaves his voluntary retirement