जनतेशी ‘सुसंवाद’ संपला

By Admin | Updated: September 2, 2015 03:54 IST2015-09-02T03:54:57+5:302015-09-02T03:54:57+5:30

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी मुंबईतील जनतेशी संवाद तुटला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी ‘सुसंवाद जनतेशी’ या नावाने जनता दरबार सुरू करण्यात आला होता

The 'harmony' with the masses ended | जनतेशी ‘सुसंवाद’ संपला

जनतेशी ‘सुसंवाद’ संपला

नामदेव मोरे, नवी मुंबई
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी मुंबईतील जनतेशी संवाद तुटला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी ‘सुसंवाद जनतेशी’ या नावाने जनता दरबार सुरू करण्यात आला होता. परंतु पहिल्याच दरबारानंतर तो बंदही करण्यात आला. खासदार राजन विचारे यांनीही अद्याप जनसंपर्क कार्यालय सुरू केलेले नाही. यामुळे मंत्री व खासदारांविषयी सामान्य नवी मुंबईकरांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
नवी मुंबई दोन दशकांपासून गणेश नाईक व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात आहे. नवी मुंबईचे राजकारण म्हणजे नाईक असे समीकरण झाले होते. निवडणूक कोणतीही असो येथील जनता नाईकांच्या पारड्यात मते टाकत होती. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी परिवर्तन केले आहे. संजीव नाईक यांच्यापेक्षा शिवसेनेच्या राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघातून तब्बल ४६ हजार २१८ मते जास्त मिळाली. नाईकांना पराभवापेक्षा बालेकिल्ल्यातून मतदान कमी पडल्याचा जबर धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटल्यामुळे ऐरोली मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळाले परंतु बेलापूरमध्ये गणेश नाईक यांनाच पराभवास सामोरे जावे लागले.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही नवी मुंबईकरांनी युतीला कौल दिला. शिवसेनेचे १७ वरून ३८ व भाजपाचा १ नगरसेवकाचे ६ झाले. सेनेमध्ये अंतर्गत भांडण झाले नसते तर महापालिकेमध्येही परिवर्तन झाले असते. शहरवासीयांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला परंतु पालकमंत्री व खासदार यांनी मात्र सामान्य जनतेशी संपर्कच तोडून टाकला आहे. सामान्य नागरिकांना दोघांशीही संपर्क साधता येत नाही. खासदारांनी ठाणे व मीरा-भार्इंदरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले परंतु नवी मुंबईमध्ये मागणी करूनही कार्यालय सुरू केलेले नाही.
माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सलग दहा वर्षे ठाणे, नवी मुंबईमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला स्वत:चे प्रश्न मांडता येत होते. पोलीस, महापालिका व इतर सर्व शासकीय विभागांशी संबंधित नागरिकांची कामे तत्काळ होत होती. आजारी व्यक्तीला उपचारासाठी तर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही मिळत होती. परंतु एकनाथ शिंदे पालकमंत्री झाल्यापासून जनता दरबार बंद झाला. सामान्य नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटणे मुश्कील झाले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पालकमंत्र्यांनी ‘सुसंवाद जनतेशी’ या नावाने जनता दरबार आयोजित करण्याचे निश्चित केले. १३ मार्चला पहिला सुसंवाद कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पाडला. चार वाजताच्या या दरबाराला पालकमंत्री तब्बल चार तास उशिरा आले. फक्त १५ जणांची निवेदने स्वीकारून दरबार गुंडाळण्यात आला. तेव्हापासून जनतेशी सुसंवाद बंद करण्यात आला आहे. याविषयी शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

Web Title: The 'harmony' with the masses ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.