कळंबोलीत अतिक्रमणावर हातोडा; पनवेल महापालिकेची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:44 IST2019-07-23T23:44:29+5:302019-07-23T23:44:40+5:30
नावडे फाटादरम्यान कारवाई

कळंबोलीत अतिक्रमणावर हातोडा; पनवेल महापालिकेची मोहीम
पनवेल : कळंबोली सर्कल ते नावडे फाटा दरम्यान अनधिकृतपणे उभारलेल्या दुकानांवर पनवेल महानगरपालिकेने मंगळवारी विशेष मोहीम राबवत कारवाई केली. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण करून रहदारीला अडथळा करणाऱ्या अनधिकृत टपºया, गॅरेजेस, बेकायदा भाडे वसूल करणारे निवारा शेड, हॉटेल अशी दोन्ही बाजूची सुमारे ५० पेक्षा जास्त अतिक्रमणे या वेळी निष्कासित करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पावसाने व्यत्यय घातल्याने ही कारवाई फूडलँड कंपनीजवळ स्थगित करण्यात आली.
अतिक्रमणामुळे परिसरात वारंवार वाहतूककोंडी, अपघात आदी प्रकार घडत असल्याने पनवेल महापालिकने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई पुढेही सुरूच राहील अशी माहिती या वेळी लेंगरेकर यांनी दिली. या वेळी चारही प्रभागातील प्रभाग अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस असे मिळून १०० जण कारवाईत सहभागी होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने शहरात पावसाळ्यात देखील व्यावसायिक अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे तोडण्यात येत आहेत.