पाणपोई उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 05:04 IST2018-09-01T05:04:02+5:302018-09-01T05:04:06+5:30
पालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

पाणपोई उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना
मयूर तांबडे
पनवेल : पनवेल शहरातील सोनबा येवले नामक पाणपोईचे उद्घाटन गेल्या काही वर्षांपासून रखडलेले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी पाठपुरावा करून देखील महापालिका या पाणपोईचे उद्घाटन करण्यात अपयशी ठरलेली दिसत आहे. त्यामुळे या पाणपोईचे उद्घाटन करण्यासाठी पालिकेला मुहूर्त सापडत नसल्याचे बोलले जात आहे.
पनवेल बस स्थानकाच्या समोरील बाजूस सोनबा येवले यांच्या नावाने बांधण्यात येत असलेली पाणपोई अर्धवट अवस्थेत असलेली दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी या पाणपोईचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र आचारसंहितेचे कारण देत उद्घाटन रखडल्याचे त्यावेळी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते. विधानपरिषदेची आचारसंहिता होऊन जवळपास २ महिने होत आले तरी देखील पनवेल पालिका पाणपोईचे लोकार्पणात स्वारस्य दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पाणपोईमुळे सामान्य नागरिकांना पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या पाणपोईमुळे नागरिकांना स्वच्छ, पिण्याचे पाणी प्यायला मिळणार आहे. त्यामुळे पाणपोई लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पनवेल नगरपालिका असताना बस स्थानकासमोरील जागेत पाणपोईचे काम सुरु करण्यात आले होते. सोनबा येवले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणपोई पनवेल शहरातील सरोवर हॉटेलसमोर बांधण्यात आली आहे. लाखो रु पये खर्च करून पूर्ण झालेली ही पाणपोई सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पनवेल महापालिका होऊन २ वर्षे होत आली तरी देखील पाणपोई सुरु केली जात नाही. आधार फाउंडेशनच्या वतीने देखील पाणपोईच्या कामासाठी निवेदन देण्यात आले होते, मात्र महापालिकेला याचे काहीच देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही पाणपोई सुरु होऊन नागरिकांना पाणपोईचे पाणी केव्हा चाखायला मिळणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
पाणीपोई उद्घाटनाबाबत बांधकाम विभागाला सूचना केलेल्या असून लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येईल.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त,
पनवेल महापालिका
पालिका प्रशासनाने या सोनबा येवले पाणपोईचे उद्घाटन लवकरात लवकर करून नागरिकांना ती खुली करून द्यावी.
- प्रभाकर कांबळे,
सहचिटणीस,
शेकाप, पनवेल